कोणत्या विषयांवर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झाली तासभर चर्चा !

मुंबई नगरी टीम

मुंबई । ओबीसींची जातनिहाय आकडेवारी केंद्र सरकारकडून मिळणार नाही,राज्य मागासवर्ग आयोगाकडून इतक्यात जमा करणे शक्य नाही,त्यामुळे ओबीसी उमेदवारांच्या जागी ओबीसीच उमेदवार देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका वेळेत घेणे हिताचे राहील, अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये गुरुवारी झाल्याचे समजते आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची आज दुपारी भेट घेतली. पवार अध्यक्ष असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन कोविड उपाययोजनेसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहे. त्याचा २ कोटी ३६ लाख ८४ हजार ७५१ रुपयांचा धनादेश पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सुपूर्त केला.दोघा नेत्यांमध्ये दिड तास चर्चा झाली. यामध्ये ओबीसी आरक्षण आणि पूरग्रस्तांना द्यावयाची मदत यावर चर्चा झाल्याचे समजते. जुलै महिन्यात राज्यात २३ जिल्ह्यातील १४५ तालुक्यांत उद् भवलेल्या पूरस्थितीमुळे ४ लाख ३८ हजार ५१२ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे झाले आहेत, मदत व पुनर्वसन विभागाने मदतीची तयारी केली आहे. मात्र मदत किती व कोणत्या निकषावर द्यायची यावर घोडे अडले आहे.

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांप्रमाणे मदत द्यायची ठरल्यास ३६६ कोटी रुपये लागणार आहेत. मात्र कोकणात मागच्या जुलै २०२० मध्ये आलेल्या तौक्ते चक्रीवादळाप्रमाणे अधिकची भरपाई द्यायची ठरल्यास रक्कम १ हजार ९८ कोटींवर जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी बैठकीत दिली. राज्याची नाजुक आर्थिक परस्थिती लक्षात घेता, पूरग्रस्तांना एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत देण्याबाबत यावेळी सकारात्मक बोलणी झाली.ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका नकोत, अशी भाजपसह सर्व राजकीय पक्षांनी भूमिका घेतली आहे. कोविडच्या उत्तम उपाययोजनांमुळे आघाडी सरकारची प्रतिमा चांगली आहे. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात अर्थ नाही. मात्र सहा महिन्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा काही सुटणार नाही. त्यामुळे सर्वमान्य तोडगा काढून या निवडणुका वेळेत घ्याव्यात, अशी चर्चा दोघा नेत्यांमध्ये झाली.

त्यानुसार जिथे ओबीसी उमेदवार होते, तेथे आघाडीच्या तिन्ही पक्षांनी ओबीसी उमेदवार द्यावा. जेणेकरुन ओबीसींच्या वाट्याच्या २७ टक्के जागा कायम राहतील. तसेच विरोधी पक्ष भाजपास याचे राजकारण करता येणार नाही, अशी चर्चा पवार-ठाकरे यांच्यात झाल्याचे समजते.दोघा नेत्यांची आजची भेट राजकीय नव्हती. तसे असते तर जयंत पाटील, मी आणि बाळासाहेब थोरात यांना बैठकीस बोलावले असते, असे सांगत पवार आणि ठाकरे भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी फेटाळून लावला.

Previous articleनिर्दोष मुक्तता होताच आक्रमक छगन भुजबळ काय म्हणाले ?
Next articleजिल्हा परिषद,पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी येत्या ५ ऑक्टोबरला मतदान