निर्दोष मुक्तता होताच आक्रमक छगन भुजबळ काय म्हणाले ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । “सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही,” अशी प्रतिक्रिया व्यक्त करत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची तसेच माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांची विशेष सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या कथित घोटाळ्याप्रकरणी भुजबळ कुटुंबियांवर अनेक आरोप करण्यात आले होते. याप्रकरणी भुजबळ यांची नाहक बदनामी देखील करण्यात आली. मात्र आज अखेर मुंबई सत्र न्यायालयाने भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे.

न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री छगन भुजबळ यांनी या कथित घोटाळा प्रकरणात जवळपास सव्वा दोन वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात रहावे लागले. अनेक खोटेनाटे आरोप आमच्यावर झाले तसेच मीडिया ट्रायलदेखील झाली. जे महाराष्ट्र सदन फाईव्ह स्टार हॉटेलसारखं बांधण्यात आलं.देशातील अनेक व्यक्ती याचे कौतुक करतात. ज्या पद्धतीने मंत्रिमंडळ बैठकीत ठरवण्यात आले होते की, या प्रकरणात १०० कोटी रुपयांचा एफएसआय देण्यात येईल, मात्र आजपर्यंत एकफूट एफएसआय त्या कंत्राटदाराला मिळाला नाही, एक रुपयादेखील त्या कंत्राटदाराला दिला नाही तरीदेखील आमच्यावर आरोप करण्यात आले. याच प्रकरणानंतर ईडीने केस दाखल केली आणि त्यानंतर सव्वा दोन वर्ष आम्हाला जेलमध्ये जावे लागले.मात्र गेले काही महिने आमच्या वकिलांनी सत्य परिस्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आणि आज न्यायालयाने आम्हाला या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले असे सांगितले. हा संपूर्ण संघर्षमय प्रवास भुजबळ यांनी माध्यमांशी उलगडून सांगितला. या कठीण काळात ज्या मंडळींनी सहकार्य केले त्या सर्वांचे भुजबळ यांनी आभार व्यक्त केले.

काही लोकांनी त्रासच द्यायचं असे ठरवले होते आणि त्या माध्यमातूनच आमच्यावर आरोप करण्यात आले मात्र आज आलेला निकाल आम्ही अतिशय विनम्रपणे,संयमपूर्वक आम्ही स्वीकारतो आणि याप्रकरणात कोणाहीबद्दल आमच्या मनात राग नाही,द्वेषबुद्धी नाही, कोणाच्याही बद्दल तक्रार नाही आणि कोर्टाच्या निकलाबद्दल आनंद आहे असेही भुजबळ यांनी सांगितले. द्वेषबुद्धीने मुद्दाम आम्हाला त्रास देण्यासाठी आरोपांची राळ उठवण्यात आली का ?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला मात्र असे कितीही प्रयत्न केले तरी माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि लोकांवर देखील माझा विश्वास आहे असे मत व्यक्त केले.”साजिशे लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने के लिए, ये जनता की दुवाएँ है, उन्हे मुक्कमल नहीं होने देती” या शायरीतून छगन भुजबळ यांनी आपला आनंद व्यक्त केला.जनतेच्या आशीर्वादामुळे याप्रकरणातून आम्हाला निर्दोष म्हणून वगळण्यात आले.आम्ही निर्दोष आहोत हे शरद पवार यांच्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व नेत्यांना माहीत होतेच. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही हा विश्वास होता,त्यामुळेच त्यांनी मला मंत्रिमंडळात जागा दिली असे सांगत भुजबळ यांनी सर्वांचे आभार मानले.

Previous articleतर जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपालिका महाविकास आघाडीकडे : अजितदादांचे भाकित
Next articleकोणत्या विषयांवर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झाली तासभर चर्चा !