परमबीर सिंह, अनिल देशमुख नेमके आहेत कुठे ? प्रविण दरेकरांचा सवाल

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके आणि १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. मात्र ते आता गायब असून नेमके कुठे आहेत ? अनिल देशमुख राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सहकारी व महत्वाचे नेते असल्यामुळे ते नेमके कुठे आहेत हे पक्षाला माहीत असणे अपेक्षित आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी किंबहुना पक्षाने अनिल देशमुख नेमके कुठे आहेत हे सांगण्याची आवश्यकता असल्याचे आव्हान विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी पक्षाला केले आहे.

दरेकर म्हणाले की,मागील काही महिन्यांपासून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख व मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी परमबीर सिंह यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला असून आज प्रसारमाध्यमांद्वारे अनिल देशमुख व माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह गायब आहेत, अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. मग अनिल देशमुख आता नेमके कुठे आहेत, असा सवाल उपस्थित करत ते म्हणाले, अनिल देशमुख मतदारसंघात आहेत, मुंबईत आहेत की इतर ठिकाणी, याचा शोध सीबीआय, ईडी घेतीलच. परंतु सर्व कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी समोर यावे,असेही दरेकर यांनी यावेळी सांगितले.

दरेकर म्हणाले,मुंबईचे पोलिस आयुक्तसुद्धा सापडत नाहीत, खरे म्हणजे ते सेवेत डीसकनेक्टेड नसताना राज्याच्या गृहमंत्र्यांना माहीत असणे अपेक्षित आहे.एकंदर राज्यामध्ये अशा प्रकारची गोंधळाची स्थिती निर्माण झाली असेल तर नेमके राज्याच्या गृह विभागात काय चालले आहे हे समोर येत असल्याचे दरेकर यांनी यावेळी सांगितले.

Previous articleजिल्हा परिषद,पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी येत्या ५ ऑक्टोबरला मतदान
Next articleकिरीट सोमैय्यांचा गौप्यस्फोट : मंत्री हसन मुश्रीफ आणि कुटुंबाचा १२७ कोटींचा घोटाळा