रस्त्यांची दुर्दशा बघून मंत्री संतापले; अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई नगरी टीम

ठाणे । पावसाळ्याआधी रस्त्यांची डागडुजी करूनही पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात,याचा अर्थ कामाची गुणवत्ता तपासली जात नाही.त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील हे रस्ते असतील, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करा,संबंधित ठेकेदारावर कारवाई करा,गरज पडल्यास ब्लॅकलिस्ट करा,संपूर्ण चौकशी करून कठोर कारवाई करा,असे निर्देश राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिले.

सततचा पाऊस आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे गेले चार-पाच दिवस ठाणेकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. याची गंभीर दखल घेऊन पालकमंत्री शिंदे यांनी आज ठाणे महापालिका, एमएसआरडीसी,एमएमआरडीए,सार्वजनिक बांधकाम विभाग,मेट्रो आणि एनएचएआय आदी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह आनंदनगर चेकनाका ते गायमुख तसेच पडघ्यापर्यंतच्या रस्त्यांची आणि खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहाणी केली. ठाण्याचे प्रवेशद्वार असलेल्या आनंदनगर चेकनाक्यापासून शिंदे यांनी पाहाणीला सुरुवात केली. तिथे सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी या प्रकरणी कोणाचीही गय करू नका, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना दिले. संबंधित रस्ता महापालिकेचा आहे की,एमएमआरडीएचा आहे की,एमएसआरडीसीचा याच्याशी सामान्य नागरिकांना काहीही देणेघेणे नाही. ठेकेदार रस्त्याचे काम नीट करत नसेल, तर त्याच्यावर लक्ष ठेवण्याचे काम अधिकाऱ्यांचे नाही का, साहित्य नीट वापरले जात आहे की नाही, पुरेसे वापरले जात आहे की नाही, ठरवून दिलेल्या दर्जानुसार काम केले जात आहे की नाही, हे पाहाणे संबंधित अधिकाऱ्याचे काम आहे. यात कुचराई होत असेल तर कठोर कारवाई केली जाईल.ठेकेदाराला खड्डे बुजविण्यासाठी पैसे दिले जातात ना, तो फुकट तर काम करत नाही ना, मग पैसे देऊनही कामाचा दर्जा राखला जात नसेल तर जबाबदार कोण, असा सवाल करून शिंदे यांनी पावसाळ्याआधी खड्डे बुजवूनही पुन्हा खड्डे कसे पडले,याची संपूर्ण चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले.

सरकार रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पैसे देते,पण पहिल्याच पावसात पुन्हा खड्डे पडतात. त्यामुळे सरकारचे नाव खराब होते. प्रशासन आणि ठेकेदाराच्या कामचुकारपणामुळे लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. इथून पुढे हे प्रकार खपवून घेणार नाही, असा इशाराही शिंदे यांनी दिला. तीन हात नाका,घोडबंदर रस्त्यावरील आनंदनगर, तसेच गायमुख येथे खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहाणी केली असता तिथे योग्य प्रकारे काम होत नसल्याचे शिंदे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आणि गुणवत्तेकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, राज्य रस्ते विकास महामंडळ, एमएमआरडीए आणि राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी उपस्थित होते.

Previous articleमहिला पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय ; बातमीवर क्लिक करा आणि वाचा
Next articleराज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा ; दरेकरांचा सरकारवर हल्लाबोल