मराठवाडयात ओला दुष्काळ जाहीर करा; पंचनामे न करता तातडीने मदत द्या

मुंबई नगरी टीम

मुंबई । अतिवृष्टीमुळे मराठवाड्यामधील आठही जिल्ह्यांत अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्याप्रमाणे प्रचंड नुकसान झाले होते त्याचप्रमाणे लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, हिंगोली या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही गंभीर परिस्थिती पाहता राज्य सरकारने अतिवृष्टी झालेल्या मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे न करता शेतकरी व जनतेला तातडीने मदत देण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केली. केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, मराठवाडयात झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे ज्या भागांमधील शेतकरी अडचणीत आहे त्या भागात कुठल्याही प्रकारचे पंचनामे न करता त्यांना तातडीने मदत करण्याची आवश्यकता आहे. या भागात नाले दुथडी भरुन वाहत आहेत, तर शेतीपीक पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत तेथील पंचनामे करण्यासाठी व तेथील परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अजून किमान आठ दिवसांचा कालावधी लागेल. तोपर्यंत येथील शेतकरी व जनतेचे खूप हाल होतील. त्यामुळे अतिवृष्टी झालेल्या या भागात ओला दुष्काळ जाहीर झाला तर या भागातील शेतक-यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळू शकेल असेही दरेकर यांनी सांगितले.

दरेकर यांनी सांगितले की,राज्याचे पुनर्वसनमंत्री,कृषीमंत्री यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांमध्ये तातडीने आढावा घेणे आवश्यक आहे.विभागीय आयुक्त कार्यालयात परिस्थितीतचा आढावा घेणे गरजेचे आहे. पण हे मंत्री महोदय सध्या निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याचे समजते. कृषीमंत्री दादा भुसे पालघरच्या निवडणुकीत व्यस्त आहेत हे दुर्दैवी आहे. राज्यकर्त्यांनी प्रथम संकटात सापडलेल्या जनतेची काळजी घेतली पाहिजे. जनतेला मायबाप सरकार म्हणतात. जनता आहे म्हणून निवडणुका आहेत आणि म्हणून सरकार आहे,याचे भान सरकारला असले पाहिजे, असा टोलाही दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.

Previous articleभाजपमध्ये गेलेल्या लोकांना ईडी,आयकर विभाग आणि सीबीआयचे संरक्षण आहे का ?
Next articleपूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा : सीईटीची परीक्षा ९ आणि १० ऑक्टोबरला होणार