भाजपमध्ये गेलेल्या लोकांना ईडी,आयकर विभाग आणि सीबीआयचे संरक्षण आहे का ?

मुंबई नगरी टीम

अहमदनगर । भाजपमध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय,ईडी आणि आयकर विभाग या यंत्रणेंचे संरक्षण आहे का ? आम्ही अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अहमदनगर येथे आले असता जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली.यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पाटील यांनी हा सवाल केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे आणि हे जाणीवपूर्वक सुरू असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.या देशात आणि राज्यात ज्यांनी खरंच मनीलॉड्रींग केलंय ते बाजुला राहिले आणि ज्यांच्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणेंने ठपका ठेवला ते भाजपमध्ये गेले आहेत त्यांचं काय झालं हे एकदा ईडीने जनतेला सांगावे असेही पाटील म्हणाले.

एकनाथ खडसे यांच्यावर जे आरोप लावण्यात आले आहेत ते मनीलॉड्रींगचा प्रकार नाही. त्यांच्या जावयाने कर्ज काढून त्या जमीनीचा व्यवहार केला आहे.तर दुसरीकडे हसन मुश्रीफ यांच्या बाबतीतही लोकांनी कारखान्यात पैसे जमा केले आहेत तरीही मनीलॉड्रींगचा प्रकार असल्याचा ठपका ठेवला गेला आहे. हे जाणूनबुजून केले जात आहे असेही पाटील यांनी स्पष्ट केले. अनिल देशमुख यांच्यावरही पैसे मागितल्याचा आरोप झाला.मात्र त्यांनी पैसे घेतले नाही असे भुजबळ व संजय पाटील या अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याचे स्पष्ट केले आहे याबाबतही पाटील यांनी यावेळी सांगितले.

Previous articleमराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार,धीर सोडू नका ।
Next articleमराठवाडयात ओला दुष्काळ जाहीर करा; पंचनामे न करता तातडीने मदत द्या