नवाब मलिकांना बेछूट आरोपाचे गंभीर परिणाम भोगावे लागतील

मुंबई नगरी टीम

मुंबई । संकटात सापडलेले शेतकरी, महिलांवरील वाढलेले अत्याचार, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अशा गंभीर विषयांवर बोलण्यासारखे काही नसल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून कोणाला तरी उभे केले जाते. त्याच पद्धतीने अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नवाब मलिक बेछूट आरोप करत आहेत. पण भारतीय जनता पार्टी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या वादात ओढण्याचे गंभीर परिणाम मलिक यांना भोगावे लागतील, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.

मलिक यांनी केलेल्या आरोपांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले आहे, असे मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी निदर्शनाला आणले.राज्यात महापूर आला. अतिवृष्टी झाली. मराठवाड्यात ३८ लाख हेक्टरवरील पीक वाहून गेले, ११ लाख हेक्टर शेतजमीन खरडून गेली. शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळायची आहे. त्यांना पीक विमा मिळायचा आहे. विशेष जास्त पाऊस नसतानाही पूर का आला,याची अद्याप चौकशी झालेली नाही.कोरोनासाठी जे काही थोडे पॅकेज राज्य सरकारने जाहीर केले त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही.एसटी कर्मचाऱ्यांचा अघोषित संप चालू आहे आणि २९ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे शेकड्यांनी वाढले आहेत. अशा गंभीर विषयांवर बोलण्यासारखे काही नसल्याने महाविकास आघाडीकडून बेछूट आरोप करणे चालू आहे असे पाटील म्हणाले.

मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर बेछूट आरोप केले. पण वानखेडे यांच्या पाठीशी समाज उभा आहे. भारतीय जनता पार्टीही अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील.नीरज गुंडे हे चांगले सामाजिक कार्यकर्त आहेत. पण तरीही त्यांच्याविरोधात काही पुरावे आढळले तर चौकशी करा. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि कोणाच्या विरोधात काही पुरावे असतील तर बिनधास्त चौकशी करावी. पण प्रसिद्धी माध्यमांसमोर आक्रोश कशाला करता ? रोज तोंडाची वाफ का दवडता ? असा टोलाही पाटील यांनी लगावला.

Previous articleनवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध,त्याचे पुरावे शरद पवारांना देणार
Next articleनवाब मलिक यांचे डोके ठिकाणावर आहे का ? प्रविण दरेकर यांची टिका