मुंबई नगरी टीम
मुंबई । भाजपचा आणि मोदी शहांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरात राज्याच्या शेजारी असलेल्या दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे तर महाराष्ट्राच्या बाहेर पहिल्यांदाच शिवसेनेचा खासदार निवडून आला असल्याने शिवसेनेत आणि महाविकास आघाडीत आनंदाचे वातावरण आहे.दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर भाजपचे उमेदवार महेश गावित यांचा पराभव केला आहे.
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर मुंबईत आत्महत्या केल्याने रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक पार पडली.मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा महाराष्ट्राच्या विधानसभेत चांगलाच गाजला होता.यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपला लक्ष केले होते.मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी भाजपावर आरोप केले होते.या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाल्यावर मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर आणि त्यांचे पुत्र अभिनव डेलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून शिवसेनेत प्रवेश केला होता.या पोटनिवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर,भाजपचे महेश गावित आणि काँग्रेसचे महेश धोदी यांच्यात तिरंगी लढत झाली.या पोटनिवडणूकीची मतमोजणी आज झाली.या पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी शिवसेनेकडून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे,खासदार संजय राऊत आदी नेते उतरले होते.तर भाजपकडून केंद्रीयमंत्री भारती पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात रंगत आणली होती. या पोटनिवडमूकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांना १ लाख १६ हजार ८३४ तर भाजपचे उमेदवार महेश गावित यांना ६६ हजार १५७ मते मिळाली.शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांनी भाजपचे उमेदवार महेश गावित यांचा ५० हजार ६७७ मतांनी पराभव केला.