महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ठाकरे सरकार कोसळणार ; मे मध्ये मध्यावधी निवडणुका

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्याचे अनेक मुहूर्त विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून वर्तविण्यात आले आहेत. मात्र येत्या फेब्रुवारीमध्ये मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार कोसळेल आणि मे महिन्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होतील असा दावा करतानाच,राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाच पुढाकार असेल असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना हा गौप्यस्फोट केला.राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येईपर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असेही पाटील यांनी स्पष्ट केले.राज्यातील ठाकरे सरकार कसे कोसळेल याबाबत बोलताना पाटील म्हणाले की,शरद पवारांना ज्या पद्धतीने सरकार चालवायचे आहे,त्या पद्धतीने सरकार चालत नाही. त्यामुळे फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत त्यांनी आपला राग आटोक्यात ठेवला आहे.पती-पत्नीमध्ये भांडण झाले की ते दोघेही एका टप्प्यापर्यंत सहन करतात. त्यानंतर त्यांचा घटस्फोट होऊन ते वेगळे होतात.राज्यातील महाविकास आघाडी सरकारचेही असेच होईल असा अंदाजही त्यांनी वर्तवला.महानगरपालिकांच्या निवडणुका होताच राज्यातील ठाकरे सरकार कोसळेल, हे सरकार पाडण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाच पुढाकार असेल असेही पाटील यांनी सांगून,राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास भाजपला १२२ ते १३० जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला.

येत्या निवडणुकीत मनसेशी युती केल्यास फायद्या पेक्षा तोटाच होण्याची शक्यता पाटील यांनी वर्तवली.येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेशच्या निवडणुका होणार आहे.शिवाय मुंबईतील अमराठी वर्ग हा मनसेला पसंत करत नाही.त्यामुळे भाजप मनसे एकत्र आल्यास त्याचा भाजपला मोठा तोटा होवू शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी पाटील यांनी एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या विषयी भाष्य केले.वानखेडे यांना पाठिंबा देण्याची भाजपाला गरज नाही.ते अधिकारी आहेत.त्यांनी काय करावे हे त्यांना स्वतःला माहित आहे.मात्र राज्यातील सत्ताधारी त्यांचे मनोधैर्य खच्चीकर करण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका त्यांनी केली.मुंबईतून विधानपरिषदेच्या एका जागेसाठी चित्रा वाघ यांच्या नावाची चर्चा आहे यावर बोलताना पाटील म्हणाले की,मुंबईतून विधान परिषदेसाठी कोणाला उमेदवारी द्यावी ? याबाबत पक्षात अद्याप एकमत झालेले नाही.मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उपयुक्त ठरण्या-या नावाचा शोध पक्षाकडून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत.यानिमित्ताने राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या,वाढती गुन्हेगारी यावर भाजप ७८ पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर हल्लाबोल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Previous articleमुंबई बॅंकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांच्या विरोधात कारवाई न करण्याचे आदेश
Next articleविधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना,भाजपच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा