विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना,भाजपच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा

मुंबई नगरी टीम

मुंबई । विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी येत्या १० डिसेंबर रोजी निवडणूक होत असून,या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.शिवसेनेने मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी आमदार सुनील शिंदे यांना तर भाजपने माजी मंत्री आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूरमधून उमेदवारी दिली आहे.

विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी येत्या १० डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे.सोलापूर आणि अहमदनगर वगळता उर्वरित सहा जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम यापूर्वीच जाहीर केला आहे.काल रात्री उशारा शिवसेनेच्या दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली.विधानसभा निवडणुकीत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळीची जागा सोडणारे माजी आमदार सुनील शिंदे यांना शिवसेनेने मुंबई महानगर पालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.या मतदारसंघातून माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या नावाचीही चर्चा होती.अकोला-बुलढाणा-वाशीम मतदारसंघातून विद्यमान आमदार गोपिकिशन बिजोरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपकडूनही काल उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी आमदार आणि उत्तर भारतीय समाजाचे नेते राजहंस सिंह यांना उमेदवारी जाहीर केली आहे.तर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेले माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.कोल्हापूरमधून अमल महाडिक,धुळे-नंदूरबारमधून अमरीश पटेल तर अकोला-बुलडाणा-वाशिममधून वसंत खंडेलवाल यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.भाजपकडून मुंबईच्या जागेसाठी भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ,कृपाशंकर सिंह यांच्या नावाची चर्चा होती.विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आलेले माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्ती असल्याने त्यांना नागपूरमधून उमेदवारी देऊन त्यांच्यावरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची चर्चा आहे.या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २३ नोव्हेंबर असून,२४ नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी होईल तर २६ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार आहे. १० डिसेंबरला या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार आहे.

Previous articleमहानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ठाकरे सरकार कोसळणार ; मे मध्ये मध्यावधी निवडणुका
Next articleविधानपरिषदेची पोटनिवडणूकही बिनविरोध;काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड