विधानपरिषदेची पोटनिवडणूकही बिनविरोध;काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यसभेच्या पोटनिवडणुकी पाठोपाठ आता विधानपरिषदेची पोटनिवडणूकही बिनविरोध झाली आहे.काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहिर झाली होती.मात्र भाजपचे उमेदवार संजय केनेकर यांनी माघार घेतल्याने काँग्रेसच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.

काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी २९ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार होती. या निवडणूकीसाठी भाजपने औरंगाबादचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांना तर काँग्रेसने दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली होती.आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे उमेदवार संजय केनेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड झाली आहे.विशेष म्हणजे राज्यसभेच्या पोटनिवडणूकीनंतर विधानपरिषदेची निवडणूकही बिनविरोध करण्यात काँग्रेस पक्ष यशस्वी ठरला आहे.काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसने रजनी पाटील यांनी तर भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली होती. राज्यसभेच्या निवडणूकीत गुप्त मतदान पद्धत असल्याने मतं फुटू नये म्हणून आणि काँग्रेसच्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती भाजपच्या नेत्यांना केल्याने या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली होती.

विधानपरिषद पोटनिवडणूकीच्या रिंगणात काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही पोटनिवडणुक बिनविरोध होण्यासाठी भाजपाच्या उमेदवाराने माघार घ्यावी,असे आवाहन केले होते.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे उमेदवार संजय केनेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने विधानपरिषदेची पोटनिवडणूकही बिनविरोध झाली आहे.काँग्रेसच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांची विधान परिषद पोटनिवडणूकीत बिनविरोध निवड झाली.महाविकास आघाडीने सातव यांना पाठिंबा दिला होता,पोटनिवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष तसेच विरोधी पक्ष भाजपाचे आभार मानले.निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रज्ञा सातव यांना प्रमाणपत्र देताना विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. या मान्यवरांनी विजयी उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

Previous articleविधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना,भाजपच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा
Next articleमुख्यमंत्र्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज केव्हा मिळणार ? रुग्णालयाने दिली महत्वाची माहिती