भाजपात गेलेले राष्ट्रवादीचे आमदार लवकरच घरवापसी करणार : मलिकांचा गौप्यस्फोट

मुंबई नगरी टीम

मुंबई । चीन संदर्भातील महत्त्वाच्या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारसाहेब आणि प्रफुल पटेल दिल्लीत गेले असताना पवार यांचा एक फोटो मॉर्प करुन भाजपच्या आयटी सेलने प्रसिद्ध करुन जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र आम्ही त्यांचा हा फर्जीवाडा समोर आणला असून,राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्यांना थोपवून ठेवण्यासाठी भाजपचे नेते पुड्या सोडत आहेत. मात्र काही दिवसातच भाजपला सोडचिठ्ठी देऊन आमदार घरवापसी करतील असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

केंद्रीयमंत्री नेते नारायण राणे यांनी मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार असे भाकीत केल्यानंतर तात्काळ भाजपच्या आयटी सेलने शरद पवार एक फोटो मॉर्प करुन सोशल मीडियावर शेअर करत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र तात्काळ आम्ही पवार यांचा खरा फोटो जनतेसमोर आणला आणि भाजपचा फर्जीवाडा उघड केला असे नवाब मलिक म्हणाले. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस भविष्यवाणी करत होते मात्र ती भविष्यवाणी खरी झाली नाही त्यानंतर चंद्रकांत पाटील स्वप्नातही घोषणा करु लागले त्यानेही फरक पडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर नारायण राणे त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांनी तर नवसाच्या कोंबड्या व बोकड इतके जमवले की त्यांच्यासाठी राणेंना बोलावं लागतंय अशी खोचक टिकाही मलिक यांनी केली.जनतेचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. आता बरेच आमदार राष्ट्रवादीतून भाजपात गेले त्यांना थोपवून ठेवण्यासाठी भाजपचे नेते पुड्या सोडत आहेत. मात्र सत्य समोर आहे आणि काही दिवसातच भाजपला सोडचिठ्ठी देऊन आमदार घरवापसी करतील असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय यंत्रणेच्या अधिका-यांकडून माझी व माझ्या कुटुंबाची हेरगिरी करण्यात येत आहे याबाबतचे पुरावे माझ्याकडे असून याबाबतची तक्रार केंद्रीय गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांकडे करणार असल्याची माहितीही मलिक यांनी दिली. दुबईमध्ये कार्यक्रमाला गेलो असताना दोन लोकं माझ्या घराची, शाळांची व नातवंडांची माहिती घेत असताना त्यांना नागरीकांनी हटकले.त्यावेळी ते पळून गेले. त्या व्यक्तींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्या दोन्ही व्यक्तींची माहिती प्राप्त झाली आहे. ‘कू’ हॅंडलवर त्याने माझ्याविषयी याबाबतची माहिती शेअर केल्याचे दिसत आहे. माझी व माझ्या कुटुंबियांची माहिती कुणाला हवी असेल तर मी द्यायला तयार आहे असेही मलिक यांनी स्पष्ट केले.माझ्या विरोधात काही केंद्रीय यंत्रणेचे अधिकारी व्हॉटस्ॲपवर स्वतः मसुदा तयार करुन ईमेलव्दारे खोट्या तक्रारी करायला सांगत आहेत. याबाबतचे केंद्रीय अधिकार्‍याचे व्हॉटस्ॲप चॅटचे पुरावे माझ्या हाती लागले आहेत. राज्यातील मंत्र्यांना अडकवण्याचा डाव केंद्रीय यंत्रणा करणार असेल तर ते सहन करणार नाही असा स्पष्ट इशाराही मलिक यांनी दिला आहे.केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अधिपत्याखाली काम करणारे अधिकारी याप्रकारे कारवाई करणार असतील तर ते आम्ही बघू पण असे डाव खेळून भीती निर्माण करण्याचे काम केंद्रीय यंत्रणा करत असेल तर या डावाला घाबरणार नाही असा इशाराही मलिक यांनी दिला आहे.एका मंत्र्यांची हेरगिरी करुन खोट्या तक्रारी करण्याचा प्रयत्न होत असेल तर ही गंभीर बाब आहे त्यामुळे याबाबतची तक्रार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुंबई पोलिस आयुक्तांकडे रितसर करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.

Previous articleआफ्रिकेतील नव्या व्हेरियंटचा धसका; महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय
Next articleयेत्या शैक्षणिक वर्षात पहिलीपासून ‘हा’ अभ्यास लागू होणार ;शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा