मुंबई नगरी टीम
मुंबई । अर्थसंकल्पीय अधिवेशनापुर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना जमीन व्यवहारामुळे अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे.दुसरीकडे विरोधकांनी त्यांच्या अटकेची मागणी लावून धरली आहे.तर कोणत्याही परिस्थितीत नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याचे महाविकास आघाडीने स्पष्ट केल्याने उद्यापासून सुरू होणा-या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भ्रष्टाचाराच्या आरोपवरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडण्याच्या शक्यता असल्याने ख-या अर्थाने हे अधिवेशन वादळी ठरणार आहे.
उद्या गुरूवारपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे.येत्या २५ मार्चपर्यंत चालणा-या या अधिवेशनात भ्रष्टाचार आणि विविध नेत्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरून गोंधळ होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे अंमलबजावणी संचालनालयाच्या अटकेत आहेत.अनिल देशमुख आणि संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यावर त्यांचे लगेच राजीनामे घेण्यात आले मात्र नवाब मलिक यांना अटक करण्यात आली असतानाही त्यांचा राजीनामा घेतला नसल्याने विरोधी पक्षाचे नेते आक्रमक झाले आहेत.मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.तर विरोधकांनी कितीही गोंधळ घालायचा तेवढा घालूदेत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही असे मंत्री जयंत पाटील यांनी विरोधकांना आव्हान दिले असल्याने विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने येण्याची शक्यता आहे.विरोधक महाविकास आघाडीतील नेत्यांचा भ्रष्टाचार,लवासाप्रकरणी उच्च न्यायालयाने ओढलेले ताशेरे,शेतकरी कर्जमाफी,कायदा व सुव्यवस्था,शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडणे यासह अन्य मुद्दयावर आवाज उठविणार आहे.मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची रायगड जिल्ह्यातील जमीन खरेदीसह परिवहनमंत्री अनिल परब, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव या नेत्यावर प्राप्तीकर विभागाने घातलेल्या धाडी याचेही तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.
महाविकास आघाडीतील अनेक नेत्यावर ईडी आणि अन्य केंद्रीय यंत्रणांकडून कारवाई व चौकशी सुरू आहे.हा मुद्दा सत्ताधारी लावून धरण्याची शक्यता आहे.केंद्रीय यंत्रणांकडून सत्ताधारी नेत्याना लक्ष्य करण्याचा मुद्दा सत्ताधारी उपस्थित करून विरोधकांना जशास तसे उत्तर देण्याच्या तयारीत आहेत.आक्रमक विरोधकांचे हल्ले परतावून लावण्यासाठी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना कानमंत्र दिला आहे.शिवाय महाविकास आघाडीतील आमदारांची बैठकही पार पडली आहे.यामध्ये विरोधकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्याच आल्याचे समजते.राज्यात फडणवीस यांचे सरकार असताना फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर आरोप केले होते.त्याचा आधार घेत सत्ताधारी विरोधकांना कोंडीत पडण्याची संधी सोडणार नसल्याचे चित्र आहे.या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर झालेले भ्रष्टाचारचे आरोप,नवाब मलिक यांचा राजीनामा,भाजपचे माजी खासदार किरीट सौमय्यांवर संजय़ राऊत यांनी केलेले आरोप,नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर केलेली कारवाई,केंद्रीय यंत्रणांचा वापर,ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण,कोरोना काळातील भ्रष्टाचार शेतकऱ्यांची वीजबील माफी,पीक विमा आदी मुद्द्यावर रणकंदन होण्याची शक्यता असल्याने उद्यापासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.