पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीत काय चर्चा झाली ? शरद पवारांनी दिली माहिती

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात सध्या सुरू असलेल्या ईडींच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.या भेटीनंतर मोदी आणि पवार यांच्यात काय चर्चा झाली यावर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क वर्तवले जात असतानाच या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती खुद्द शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील राजकीय वातावरण तप्त असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून चर्चा केली.या भेटीनंतर या दोन नेत्यांमध्ये नक्की कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत कुतुहल निर्माण झाले होते.मोदी यांच्या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती पवार यांनी पत्रकार परिषद घेवून सांगितली.या भेटीत प्रामुख्याने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीच्या मंजुरीसंदर्भात आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत पंतप्रधान मोदी यांच्या भेटीत चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात राज्यपालांना यादी देवूनही यावर गेल्या दोन वर्षांपासून राज्यपालांनी यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही.त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या जागा रिक्त आहेत याबाबत पंतप्रधानांसोबत चर्चा केल्याचे सांगतानाच महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या कारवायांबाबत पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केली नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.कालच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईसंदर्भात पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

संजय राऊत हे राज्यसभेचे सदस्य असून,ते सामनाचे कार्यकारी संपादकही आहेत.काल त्यांच्यावर ईडीने कारवाई करीत त्यांचा मुंबईतील एक फ्लॅट आणि अलिबागमधील अर्धा एकर जमीन जप्त केली आहे. हा अन्याय असून ही गोष्ट पंतप्रधान मोदींच्या लक्षात आणून दिली, असे शरद पवार यांनी सांगितले.या दोन्ही विषयावर पंतप्रधान गंभीरपणे विचार करतील आणि निर्णय घेतील,अशी आशा पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

Previous articleसंजय राऊतांवरील कारवाईमुळे केंद्राचा कारभार कसा सुरूय हे लक्षात येतय
Next articleकाँग्रेसच्या आमदारांनी सोनिया गांधींकडे काँग्रेसच्या कोणत्या मंत्र्याची तक्रार केली ?