मुंबई नगरी टीम
मुंबई । पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत अमूलाग्र सुधारणा आणि पायाभूत सुविधा निर्मितीच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना आज आणखी एक यश मिळाले असून पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-१ ची विस्तारीत मार्गिका स्वारगेट ते कात्रज (कॉरिडोर-२ ए) या ५.४६४ कि.मी. लांबी,३ स्थानके असलेल्या ३६६८.०४ कोटी प्रकल्प पूर्णत्व खर्चाच्या पूर्णत: भूयारी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महामेट्रो) मार्फत अंमलबजावणी करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वारगेट ते कात्रज (कॉरिडोर-२ए) या ५.४६४ कि.मी. लांबी,३ स्थानके असलेल्या ३६६८.०४ कोटी प्रकल्प पूर्णत्व खर्चाच्या पूर्णत: भूयारी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महामेट्रो) मार्फत अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून अनुदान स्वरूपात ४५०.९५ कोटी व केंद्र व राज्य शासनाचे कर,शुल्क यांवरील खर्चासाठी बिनव्याजी दुय्यम कर्ज स्वरूपात ४४०.३२ कोटी असा एकूण ८९१.२७ कोटी निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेकडून ४५०.९५ कोटीचे अनुदान आणि भूसंपादन, पूनर्वसन व पूनर्वसाहत व बांधकाम कालावधी दरम्यानचे व्याज याकरिता २०४.१४ कोटी असे एकूण ६५५.०९ कोटी इतके वित्तीय सहाय्य महामेट्रोला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.केंद्र शासनाकडून ३००.६३ कोटी इतके अनुदान प्राप्त करण्यासाठी केंद्र शासनास विनंती करण्यात येणार आहे. सदर प्रकल्प एप्रिल,२०२७ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
पुणे शहरातील स्वारगेट व कात्रज प्रमुख उपनगरे असून त्यादरम्यान गुलटेकडी, पद्मावती, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, धनकवडी, बालाजीनगर, साईबाबानगर, आंबेगाव अशी महत्वाची ठिकाणे आहेत. या परिसरातील वांरवार होणारी वाहतुकीची कोंडी टळून रस्त्यावरील दुर्घटना, प्रदूषण, इंधन खर्च, प्रवास कालावधी यामध्ये बचत होऊन सदर परिसरातील नागरीकांना तसेच एकंदरीच पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांना वातानुकूलित, सुरक्षित, आरामदायक प्रवासासाठी स्वारगेट ते कात्रज ही भूयारी मेट्रो रेल मार्गिका निश्चितच फायदेशीर ठरणार आहे.