हनुमान चालीसा म्हणण्याने बेकारी,भुकेचा प्रश्न सुटणार आहे का ? शरद पवार

मुंबई नगरी टीम

मुंबई । आज काही दिवस आपण बघतोय जात – धर्म यांच्या नावाने पुन्हा एकदा देशाला मागे नेण्याचा प्रयत्न सुरू केला जात आहे.सध्या महागाई,बेरोजगारी,अन्नधान्याचा आणि सन्मानाने जगण्याचा लोकांचा मुलभूत प्रश्न काय आहे या प्रश्नांकडे कुणाचेही लक्ष नाही. काही लोक भलत्याच मागण्या करताना दिसत आहेत.त्यामुळे आपण संभ्रमात पडतो. या सगळ्या गोष्टीला उत्तर देण्याची भूमिका घ्यायची असेल तर शाहू – फुले – आंबेडकरांचा विचार हाच ख-या अर्थाने आपल्याला दृष्टी आणि शक्ती देणारा आहे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी व्यक्त केले.

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती मागासवर्गीय सेलच्यावतीने कृतज्ञता गौरव सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शरद पवार बोलत होते.सर्व समाजाला मुख्य प्रश्नापासून बाजूला नेण्याचा प्रयत्न होत आहे. आज टेलिव्हिजनवर काही दिवस काय बघतोय तर कुणाची सभा आहे,हे करणार ते करणार,हनुमानाच्या नावाने करणार, आणखी कुणाच्या नावाने करणार,या सगळ्या चर्चा,मागण्या याने बेकारीचा प्रश्न, भुकेचा प्रश्न सुटणार आहे का ? तुमच्यावर पिढ्यानपिढ्या होणारा अन्याय सुटणार आहे का ? असा सवाल करतानाच मुळ प्रश्नाला बगल देऊन भलत्याच गोष्टींकडे समाजाला वळवून स्वतः चा स्वार्थ साधत काही घटकांनी निकाल घेतला आणि त्या गोष्टीला प्रसिद्धी मिळते अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.शाहू – फुले – आंबेडकरांचे नाव घेतो म्हणून एका नेत्याने टिका केल्याचा उल्लेख करताना मग नावं कुणाची घ्यायची असा सवाल करत शाहू – फुले आंबेडकरांचे नाव का घेतो याबाबतची माहिती शरद पवार यांनी दिली. आज श्रीलंकेत दंगा सुरू आहे. दुसरीकडे पाकिस्तानमध्ये पंतप्रधानांना जावं लागलं मात्र हिंदूस्थान एवढा मोठा देश आहे. अनेक भाषा,अनेक जाती आहेत. त्यामुळे हा एकसंघ राहिला याचं कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आहे असेही पवार म्हणाले. विमुक्त जाती, भटक्या जमाती मागासवर्गीय सेलच्यावतीने २८ मागण्या करण्यात आल्या. त्या मागण्या महत्त्वाच्या आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे आणि जयंत पाटील यांच्यासमवेत सेलचे अध्यक्ष हिरालाल राठोड उपस्थित राहून बैठक घेऊ असे आश्वासन शरद पवार यांनी यावेळी बोलताना दिले. यावेळी शरद पवार यांनी या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघटना मजबूत हवी आणि या मजबूत संघटनेला हिरालाल राठोडसारखा नेता हवा अशा शब्दात स्तुती केली.

शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांनी आपण काम करत राहिले पाहिजे. संघटनेने या सर्व घटकांना त्या दिशेने न्यायचे आहे. हे काम केलात तर लवकर आपली नवी पिढी ही शिक्षित होईल… समृध्द होईल… न्यायासाठी प्रसंगी संघर्ष करेल व आपले मुलभूत अधिकार आपल्या पदरात पाडून घेऊन जीवनमान बदलेल तसा प्रयत्न करण्याची सर्वांची जबाबदारी आहे असेही पवार म्हणाले. या देशात पिढ्यानपिढ्या कसं वागलं पाहिजे याचे सूत्रसंचालन केले गेले… वर्णभेद केला गेला. हे भेदायचे असेल तर आरक्षण पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.आज व्हिजेएनटीच्यावतीने अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत त्यात शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ही मागणी रास्त आहे. शिक्षणाने सुवर्णसंधी मिळते. जो शिक्षणाची कास धरतो त्याचा उध्दार होतो असेही पाटील म्हणाले. आपण केलेल्या मागण्यांचा सरकारच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करु असे सांगतानाच सेलची बांधणी मजबूत करा. ताकदीने राहिलो तर अधिक शक्ती निर्माण होईल राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या पाठीशी ठामपणे उभी असे आश्वासन पाटील यांनी दिले.

या देशात आरक्षणावर घाला घातला जात आहे. आरक्षणाला शह देण्याचा प्रयत्न मनुवादी लोक करत आहेत त्यासाठी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.शाहू महाराजांनी पहिल्यांदा बहुजनांना आरक्षण दिले आणि त्यानंतर कुणी आरक्षण दिले असेल तर तो दुसरा राजा म्हणजे शरद पवारसाहेब अशा शब्दात छगन भुजबळ यांनी पवारसाहेबांच्या कृतीशील अशा कामाची स्तुती केली.

Previous articleराज ठाकरे हे स्वत: ला बाळासाहेब ठाकरे समजायला लागलेत : उद्धव ठाकरे गरजले
Next articleमविआकडून ओबीसींच्या पाठीत खंजीर; मात्र भाजप ओबीसींना २७ टक्के तिकिटे देणार