मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या गोंधळामुळे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांना दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आज ओढवली.सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने देण्यात येणा-या विविध पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली मात्र विभागाकडून देण्यात आलेल्या प्रेस नोट अक्षम्य चुका असल्याचे मंत्री महोदयांच्या निदर्शानास आणून दिल्यावर सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांना याबाबत दिलगिरी व्यक्त करावी लागली.यानंतर संबंधित प्रसे नोट मध्ये सुधारणा करण्यात आली असली तरी या चुकीला जबाबदार असणा-यांवर काय कारवाई करणार अशी विचारणा आता होवू लागली आहे.
महाराष्ट्रातील गायन आणि संगीत या कलाक्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केलेल्या कलाकारांना दरवर्षी विविध पुरस्कार देवून गौरविण्यात येते.यंदाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यासाठी आज सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.पत्रकार परिषदेपूर्वी सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून पत्रकरांना प्रेस नोटचे वितरण करण्यात आले.त्या प्रेस नोटमध्ये पुरस्काराचे नाव,पुरस्काराची माहिती आणि पुरस्कारार्थी यांची माहिती देण्यात आली होती.शास्त्रीय संगीत क्षेत्रात गायन आणि वादन यामध्ये प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल यंदाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार दिवंगत पंडित शिवकुमार शर्मा यांना जाहीर करण्यात आल्याचे नमूद करून त्यांच्या पुढे मराठीत मयत आणि इंग्रजीत एक्सपायरी असा उल्लेख करण्यात आला होता.तर शाहीरी या क्षेत्रासाठी यंदाचा शाहीर अवधुत विभूते पुरस्कार शाहीर कृष्णकांत जाधव यांना जाहीर केल्याचा नमूद केले होते.मात्र त्यांच्या नावापुढे मयत असा उल्लेख केला असल्याची बाब एका ज्येष्ठ पत्रकाराने मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली.
पोलीस ठाण्यात ज्या प्रकारे एखाद्या आरोपीच्या पुढे मयत असा उल्लेख केला जातो.त्या प्रमाणे अशा महान कलाकारापुढे मयत असा उल्लेख करणे कितपत योग्य आहे अशा शब्दात या ज्येष्ठ पत्रकाराने नाराजी व्यक्त करून या महान कलाकारांच्या नावापुढे दिवंगत किंवा कैलासवाशी असा उल्लेख केला असता तर ते योग्य झाले असते असेही त्यांनी यावेळी सुनावले.सांस्कृतिक कार्य विभागाच्या संबंधित अधिका-याने ही प्रेस नोट तयार केली होती त्यांच्याकडून ही मोठी चुक झाली होती.हे लक्षात येताच या झाल्या प्रकाराबद्दल खुद्द सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिलगिरी व्यक्त केली.मात्र अशा महत्वाच्या पुरस्कार घोषणेच्या पत्रकार परिषदेसाठी ज्यांनी ही प्रेस नोट तयार केली त्यांच्यावर काय कारवाई करणार असा प्रश्न आता विचारला जावू लागला आहे.
विविध सांस्कृतिक पुरस्कारांची सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडून घोषणा
मुंबई । सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेदरम्यान विविध पुरस्कार घोषित करीत असतानाच चित्रपट, नाटक आणि संगीत यांचे समीक्षण करणाऱ्यांचाही सन्मान करण्याचा शासनाचा विचार असल्याचेही यावेळी मंत्री देशमुख यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील गायन आणि संगीत या कलाक्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केलेल्या कलाकारांना दरवर्षी गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार दिला जातो. या वर्षाचा पुरस्कार पं.हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर करण्यात आला आहे. शास्त्रीय संगीत क्षेत्रात गायन आणि वादन यामध्ये प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केलेल्या कलाकारांना भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. या वर्षाचा पुरस्कार दिवंगत पंडित शिवकुमार शर्मा यांना जाहीर करण्यात आला आहे. लोककला क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारास ‘विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येतो. २०१९-२० या वर्षाचा पुरस्कार आतांबर शिरढोणकर यांना तर या वर्षाचा पुरस्कार संध्या माने यांना जाहीर करण्यात आला आहे. रंगभूमीवरील प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर’ यांच्या नावे रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो.२०२०-२०२१ या वर्षाचा पुरस्कार दत्ता भगत यांना तर सया वर्षाचा पुरस्कार सतिश आळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. संगीत रंगभूमीवरील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास दरवर्षी ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात येतो. २०२०-२०२१ या वर्षाचा पुरस्कार लता शिलेदार ऊर्फ दिप्ती भोगले यांना तर या वर्षाचा पुरस्कार सुधीर ठाकुर यांना जाहीर करण्यात आला आहे. या पाचही पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे आहे.
सांस्कृतिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या कलावंत व्यक्तींना सांस्कृतिक राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप १ लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. नाटक या क्षेत्रासाठी सन २०१९-२० साठी कुमार सोहोनी आणि सन २०२०-२१ साठी गंगाराम गवाणकर यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कंठसंगीत या क्षेत्रासाठी सन २०१९-२० साठी पंडितकुमार सुरुसे आणि सन २०२०-२१ साठी कल्याणजी गायकवाड यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उपशास्त्रीय संगीत या क्षेत्रासाठी सन २०१९-२०- साठी शौनक अभिषेकी आणि सन २०२०-२१ साठी देवकी पंडित यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वाद्यसंगीत या क्षेत्रासाठी सन २०१९-२०- साठी सुभाष खरोटे आणि सन २०२०-२१ साठी ओमकार गुलवडी यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठी चित्रपटासाठी सन २०१९-२० साठी मधु कांबीकर आणि सन २०२०-२१- साठी वसंत इंगळे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. किर्तन,समाजप्रबोधन या क्षेत्रासाठी सन २०१९-२०-साठी ज्ञानेश्वर वाबळे आणि सन २०२०-२१ साठी गुरुबाबा औसेकर यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तमाशा या क्षेत्रासाठी सन २०१९-२० साठी शिवाजी थोरात आणि सन २०२०-२१- साठी सुरेश काळे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शाहीरी या क्षेत्रासाठी सन २०१९-२०- साठी शाहीर अवधुत विभूते आणि सन २०२०-२१ साठी दिवंगत शाहीर कृष्णकांत जाधव यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नृत्य या क्षेत्रासाठी सन २०१९-२० साठी शुभदा वराडकर आणि सन २०२०-२१- साठी जयश्री राजगोपालन यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोककला या क्षेत्रासाठी सन २०१९-२०- साठी सरला नांदुलेकर आणि सन २०२०-२१ साठी कमलबाई शिंदे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आदिवासी गिरीजन या क्षेत्रासाठी सन २०१९-२०- साठी मोहन मेश्राम आणि सन २०२०-२१ साठी गणपत मसगे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कलादान या क्षेत्रासाठी सन २०१९-२० साठी अन्वर कुरेशी आणि सन २०२०-२१-साठी देवेंद्र दोडके यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.