बंडखोर आमदाराची खदखद : गेली अडीच वर्षे शिवसेना आमदारांसाठी वर्षाची दारं बंद होती

मुंबई नगरी टीम

मुंबई । मानेवरील शस्त्रक्रिया आणि कोरोनामुळे आमदारांना भेटू शकलो नाही अशी स्पष्ट कबुली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर बंडखोरी केलेले औरंगाबाद पश्चिमचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.शिवसेनेचे आमदार असूनही गेली अडीच वर्षे वर्षाची दारं आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल समाज माध्यमातून संवाद साधून बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन करून या बंडखोर आमदारापैकी एकाही आमदाराने मुख्यमंत्री पदावरून हटण्याची मागणी केल्यास त्वरीत या पदावरून हटेल असे सांगत,आपला मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवला.मुख्यमंत्र्यांच्या या भावनिक आवाहनानंतर गुवाहटीत असणा-या बंडखोर आमदारापैकी औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले असून,त्यांनी या पत्रात आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.काल वर्षा बंगल्याची दारं ख-या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली गेली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला.ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती.आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांमधून निवडून न येणा-या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच चाणक्य कारकून,बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते असा आरोपही शिरसाट यांनी केला.

 

शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही.मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वाना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही असा टोलाही शिरसाट यांनी या पत्रात लगावला.मतदारसंघातील कामांसाठी,इतर प्रश्रांसाठी,वैयक्तिक अडचर्णींसाठी मुख्यमंत्र्यांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन घेत नसत.शेवटी कंटाळून आम्ही वर्षाहून निघून जायचो. तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणा-या स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे ? असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.या सर्व हाल अपेक्षा आम्ही सहन केल्या.आमच्या व्यथा आपल्या बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदीही घेतली नाही किंवा पोहोचवली सुद्धा जात नव्हती.मात्र अशा वेळी आम्हाला एकनाथ शिंदे यांचा दरवाजा उघडा होता. आणि ते आम्हाला सर्व मदत करीत होते असेही त्यांनी म्हटले आहे.

अधिकारी आणि कॅाग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान आणि आमची ही सर्व गा-हाणी शिंदे ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते.त्यामुळे आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर एकनाथ शिंदे यांना आम्ही हा निर्णय घेण्यास लावला असा दावाही शिरसाट यांनी केला.हिंदुत्व,आयोध्या,राममंदीर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना ? मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेंव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखले ? असा सवालही त्यांनी केला.आम्हाला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेव्हा आमचे खरे विरोधक कॉंग्रेस राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते,मतदारसंघातली कामे करत होते.त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे ना मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो ? त्यांची कामं कशी होतात ? तुम्ही आम्हाला भेटतच नव्हता तर आम्ही मतदारांना उत्तर कार द्यायचं या विचाराने जीव कासावीस व्हायचा.आमच्या प्रत्येक कठिण प्रसंगात शिंदे यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे होते,आजही आहेत आणि उद्याही राहतील या विश्वासापोटी आम्ही शिंदे यांच्यासोबत आहोत काल तुम्ही जे काही बोललात,जे काही झाले ते अत्यंत भावनिक होते.पण त्यात आमच्या मुळ प्रश्नांची उत्तरे कुठेच मिळाली नाहीत.त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारे है भावनिक पत्र लिहावे लागले असेही शिरसाट यांनी या पत्रात म्हटले आहे.

Previous articleठाकरे सरकार अडचणीत ! एकनाथ शिंदेकडे शिवसेनेचे ३७ तर ९ अपक्ष आमदार
Next articleसंजय राऊतांचे मोठे वक्तव्य : शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार