धनुष्यबाण आणि पक्ष बळकावण्याचा मुख्यमंत्र्यांचा हेतू नाही : उदय सामंत

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ आणि शिवसेना पक्ष काबीज करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोणताही हेतू नाही. मी स्वत: सात आठ दिवस मुख्यमंत्र्यांसोबत होतो. पण त्यांचा असा कोणताही हेतू मला दिसला नाही,असे शिंदे यांच्यासोबत गेलेले रत्नागिरीचे आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

शिंदे गटामधील काही आमदार उद्धव ठाकरे यांनी चर्चेला बोलावले तर मातोश्रीवर जाऊ असे म्हणत आहेत.मात्र,शिवसेनेची भाजपशी युती झाली आहे त्यामुळे केवळ आमच्या आमदारांचे मत जाणून घेऊन चालणार नाही त्यासाठी भाजपची संमतीही घ्यावी लागणार आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे आणि भाजपच्या दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांनी पुढे यावे,असे ते म्हणाले.अलीकडच्या घडामोडींवर नजर टाकली तर विधिमंडळाशी संबंधित काही निर्णय घेण्याचा अधिकार राज्यपालांना आहे.त्याप्रमाणे त्यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले.विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेतली,फ्लोअर टेस्ट घेण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेत आल्यावर सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज बांधल्याचे सांगितले.मात्र, पीपीपी मॉडेलमुळे रत्नागिरीचे वैद्यकीय महाविद्यालय उभारले जात नाही असे निदर्शनास आणले. यांनतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला आवश्यक त्या सूचना दिल्या. पुढील वर्षापासून रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

भाजप आणि आमच्या आमदारांची संयुक्त बैठक ताज हॉटेलमध्ये झाली. त्यात स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे कुटुंबावर टिकाटिप्पणी करण्याचे काम कोणीही करू नये अशा कडक सूचना दिल्या होत्या. तरीही भाजपच्या काही नेत्यांकडून ठाकरे कुटुंबाविरोधात जी वक्तव्ये केली जात आहेत. याबाबत स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे, असे त्यांनी सांगितले.

Previous article९२ नगरपरिषदा, ४ नगरपंचायतीसाठी १८ ऑगस्टला निवडणूक : वाचा- निवडणूकीचा कार्यक्रम आणि कोणत्या नगरपरिषद,नगरपंचायतीची निवडणूक होणार
Next articleभारतीय जनता पक्ष हा भाजपा झुठी पार्टी,भारत जलाओ पार्टी,अतिरेक्यांशी संबंध असलेला पक्ष