मुंबई नगरी टीम
मुंबई । शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा तेव्हा त्यामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात होता असा गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे.तर बेकायदेशीर शिंदे सरकारचे बेकायदेशीर प्रवक्ते दीपक केसरकरांचे शरद पवार यांच्यावरील वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएने बोलावलेल्या दिल्लीतील बैठकीसाठी शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून दीपक केसरकर उपस्थित होते.त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना हा गंभीर आरोप केला आहे.शिवसनेने शिंदे यांच्या शपविधीला केलेला विरोध हा रडीचा डाव असल्याची टीका केली.राज्यातील सध्याच्या ज्या घडामोडी घडत आहेत त्यामध्ये शिवसैनिक कुठे हालला नाही.ज्यांनी सत्ता बदल करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याविरोधात हा शिवसैनिक एकत्र झाला आहे.बंडखोरी केलेल्या पैकी एखादा दुसरा आमदार सोडला तर एकही निवडून येणार नाही हे मला शिवसैनिक सांगत आहेत.सत्तापरिवर्तन झाले ते लोकांना आवडलेले नाही.शिवसैनिक नाराज आहेत त्यामुळे एक वेगळे चित्र राज्यात आगामी काळात पाहायला मिळेल असे वक्तव्य शरद पवार यांनी काल झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केले होते.पवार यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना केसरकर यांनी पवार यांच्यावर हल्ला चढवला.राज्यात शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली आहे, त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार यांचा हात होता.नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी पवारांनी मदत केली होती.मात्र राणे यांनी कोणत्या पक्षात जावे याबाबत कोणतीही सूचना केली नव्हती, असेही पवारांनी सांगितल्याचा दावा केसरकरांनी केला.छगन भुजबळ यांना स्वत: शरद पवारांनी शिवसेनेतून बाहेर नेले शिवाय राज ठाकरे यांच्या पाठिशीही शरद पवार यांचे आशीर्वाद होते असाही गौप्यस्फोट केसरकर यांनी यावेळी केला.
केसरकर यांच्या या आरोपाला राष्ट्रवादीने उत्तर दिले आहे.बेकायदेशीर शिंदे सरकारचे बेकायदेशीर प्रवक्ते दिपक केसरकर यांचे शरद पवार यांच्या विषयी केलेले वक्तव्य बेजबाबदारपणाचे असल्याची टीका महेश तपासे यांनी केली आहे.देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर लोटांगण घालणाऱ्या बंडखोर आमदारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वेदना देण्याची खरी कृती केली आहे तर शरद पवारसाहेबांनी त्यांचा स्वाभिमान,मैत्री जपण्याचे काम केल्याचे तपासे यांनी सांगितले.शिवसेनेचा इतिहास किंवा जे लोक बाहेर पडले त्याची कारणे दिपक केसरकर यांना माहीत नसावी असा टोला लगावतानाच बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री सर्वश्रुत होती याची आठवणही त्यांनी केसरकर यांना करुन दिली आहे.जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सेनेला झिडकारले त्यावेळी पवार यांनी शिवसेना,कॉंग्रेस,राष्ट्रवादी या तीन पक्षाची मोट बांधून महाविकास आघाडी तयार केली व शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले हे केसरकर सोयीस्करपणे विसरले आहेत असेही तपासे म्हणाले.