मुंबई नगरी टीम
मुंबई । शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी करून राज्यात शिंदे आणि भाजपचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट होताच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव असे नामकरण करण्याची घोषणा केली होती.मात्र हा निर्णय बेकायदेशीर असल्याचे सांगून,उद्या होणा-या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामकरणावर शिक्कामोर्तब करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामांतर करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.मात्र ती मंत्रिमंडळाची झालेली बैठक अनधिकृत होती.कारण त्यावेळी ते सरकार अल्पमतात होते.आम्ही सत्ता स्थापन करण्याचा दावा करताना आमच्याकडे बहुमत असल्याचे राज्यपालांना पत्र दिले होते.अशा वेळी कुठलीही मंत्रिमंडळाची बैठक घेता येत नाही.ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतले,ती बैठक बेकायदेशीर होती,असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याचा निर्णय आज होणा-या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.आज रविंद्रनाट्य मंदिर येथे अब्दुल सत्तार यांच्यावतीने मुख्यमंत्री शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी भाषणात त्यांनी ही घोषणा केली.