मुंबई नगरी टीम
ठाणे । शिवसेनेतून बंडखोरी केलेले आमदार आपण उठाव केला बंड केलं असे सांगत आहेत. पण हा उठाव नाही ही गद्दारीच आहे आणि तुम्हाला गद्दार म्हणूनच फिरावं लागणार आहे. बंड करायला उठाव करायला हिंमत आणि ताकद लागते, अशा शब्दात युवा सेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सुनावले आहे.राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे घटनाबाह्य आहे आणि हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार हे नक्की,तुम्ही लिहून घ्या, असे भाकितही त्यांनी यावेळी वर्तवले.
शिवसनेच्या आमदारांनी बंड केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी माजी मंत्री युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आजपासून शिव संवाद यात्रा सुरू केली आहे.या यात्रेची सुरुवात भिवंडी येथून झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातील भिवंडी येथे शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांचे दणक्यात स्वागत केले.यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आणि बंडखोर आमदारांचा खरपूस समाचार घेतला. शिवसनेच्या आमदारांनी गद्दारीच केली आहे आणि गद्दार म्हणूनच त्यांना फिराव लागणार असून,राज्यातील शिंदे-भाजप सरकार हे घटनाबाह्य असून ते कोसळणारच असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.आपण ज्यांना प्रेम दिलं,ओळख दिली, तिकिटं, मंत्रीपदं दिली.मात्र ते आपल्याला सो़डून गेले. धोका देऊन गेले, हे तुम्हाला तरी पटणारं आहे का ? आपण यांना काय कमी दिलं असा सवालही त्यांनी बंडखोर आमदारांना केला.आपलं कुटुंब म्हणून सोबत यांना बघितले आहे.मातोश्रीवर येवून जे हवं ते मागायचं. हे सर्व सुरू असताना असं नेमकं काय घडलं की यांना आपल्या पाठीत खंजीर खुपसावा वाटला.काय कमी दिलं आपण यांना ? अशी नाराजीही त्यांनी यावेळी व्यक्त करतानाच येथे शिवसैनिक,युवासैनिक,महिला आघाडी,कामगार सेना असल्याने कुठेही शिवसेना हललेली नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात राज्यात कुठेही धर्म,जातपात,भाषेचा भेदभाव झाला नाही.राज्यात सरकार असताना २४ तास सेवा केली.विकासाची कामं केली. आपण राजकारण केले नाही हे आपले कदाचित चुकले,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मी किंवा शिवसैनिक असो आपल्याला राजकारण जमले नाही.शिवसेना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या तत्वावर चालत आली आहे. याच कारणामुळे आपल्या हातून सत्ता गेली अशी खंत व्यक्त करीत जे स्वत:ला बंडखोर,शूरवीर समजत आहेत.त्यांना जेव्हा असे करायचे होते तेव्हा त्यांना पक्षप्रमुखांकडे जाऊन सांगायची हिंमत झाली नाही.पक्षाचा आदेश पाळायची हिंमत झाली नाही.त्यांना बंड करायचे असते तर महाराष्ट्रात राहून बंड केले असते,सुरतेला पळाले नसते.ज्यांनी गद्दारी केली.त्यांनी लोकांमध्ये फिरावे.ज्या लोकांनी डोक्यावर घेऊन त्यांना विधानभवनात,संसदेत पोहचवले. त्यांनी लोकांची भावना ऐकावी. काय लोकांची भावना आहे ते ऐका, असे आव्हान देखील आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांना दिले.तुम्ही जिथे गेल्यात तिथे आनंदाने रहा. आमच्या मनात तुमच्याविषयी राग नाही मात्र दु:ख आहे की एका चांगल्या माणसाच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्राच्या पाठीत खंजीर खुपसला.पण थोडी लाज उरली असेल तर आमदाराकीचा राजीनामा द्या आणि निवडणूकीला सामोरे जा असे आव्हान देतानाच,ज्यांना परत यायचे आहे त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे २४ तास उघडे आहेत असे असी सादही त्यांनी बंडखोर आमदारांना घातली.
शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे सरकारवर हल्लाबोलही केला.राज्यात पावसाने हाहाकार सुरू असताना यांचे राजकारण सुरू आहे.राज्यात दोन लोकांचे मंत्रिमंडळ आहे तेच निर्णय घेत असून,राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे सरकार घटनाबाह्य आहे आणि हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार हे नक्की तुम्ही लिहून घ्या असे भाकित देखील केले. राज्यात पूर आला असताना हे दिल्लीत बसत आहेत.त्यांना अतिवृष्टी होत आहे हे दिसत नाही तर ते फक्त युवासैनिकाला,महिला आघाडीला फोन करून धमकी देत आहेत.आपल्याकडे कोणी येतेय का ते पहात आहे पण याला कुणी घाबरत नाही.हे घाबरणारे असते तर तुमच्यासोबत सुरतला, गुवाहटीला आले असते अशा शब्दात त्यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला.राजकारणाची पण एक पातळी असते ती सोडायचा नसते.किती राजकारण कराये ? माणूसकी नावाचा काही प्रकार आहे की नाही असे सांगतानाच ही फक्त महाराष्ट्राशी गद्दारी नाही तर माणूसकीशी गद्दारी आहे,असा हल्लाबोलही त्यांनी केला.