मुंबई नगरी टीम
सातारा । राज्यातील सरकार गद्दारी करून बनवलेले घटनाबाह्य सरकार असून ते फार काळ टिकणार नाही असा दावा करत,हिम्मत असेल तर राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा असे आव्हान शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केले आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेच्या दुसरा टप्पा सुरू असून,त्यांनी कोकणानंतर पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढला आहे.आदित्य ठाकरे यांची शिव संवाद यात्रा शंभूराज देसाई यांच्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात दाखल झाली. आदित्य ठाकरे यांच्या दौ-यावेळी शिवसैनिकांनी अभूतपूर्व गर्दी करत,शिवसेनेला पाठिंबा असल्याचे दाखवून दिले.यावेळी शिवसैनिकांनी बंडखोरांना क्षमा नाही, शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाच्या पाठीशी आपण उभे असल्याचे वचन हात वर करून आदित्य ठाकरे यांना दिले.जनसमुदयाशी संवाद साधताना आपले आशीर्वाद पाठीशी राहुद्यात अशी साद आदित्य ठाकरे यांनी घातली.महाराष्ट्रात शिवसेना फोडण्याचे राजकारण सुरू असून,ठाकरे परिवार एकटे पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे,नागरिकांची एकजुट,हिंदुत्वाची एकजूट, शिवसैनिकांची एकजूट,हिंदूंची एकजूट तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे .पण हे कोणाला शक्य होणार नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
शिवसेना आणि ठाकरे परिवार वेगळे नाहीत आणि ते तुमच्या रूपाने एकजूट आहे असे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.महाराष्ट्राने तुम्हाला मान सन्मान दिला,त्या मातीबद्दल शिवराय आणि सावित्रीबाईंबद्दल बोललात,ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत.चत्या ठिकाणचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होत आहे.मात्र राज्यातील जनता सुज्ञ असल्याने हे कोणी करू शकत नाही,असा इशाराही त्यांनी दिला. राज्यातील सरकार हे गद्दारांचे आणि घटनाबाह्य असल्याने ते फार काळ टिकणार नाही असा दावा करत,हिम्मत असेल तर राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा असे आव्हान त्यांनी यावेळी बंडखोर आमदारांना केले.