भाजपने ‘गुलाब’ पाहिला,पण आता त्यांना शिवसेनेचे ‘काटे’ बघायचे आहेत !

मुंबई नगरी टीम

मुंबई । जळगावमध्ये भाजपने गुलाब पाहिला,पण आता त्यांना शिवसेनेचे काटे बघायचे आहेत,असे ठणकावतानाच,ज्यांना मोठे केले ते सोबत नसले तरी त्यांना मोठे करणारे माझ्यासोबत आहेत. आतापर्यंत त्यांनी गुलाब पाहिले आता काटे पाहा.गुलाबाचे झाड माझ्याकडे आहे,पुन्हा नवीन गुलाब फुलवीन,असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

जळगाव आणि वाशिम जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली.यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटात गेलेल्या गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला.जळगावमध्ये भाजपने गुलाब पाहिला,पण आता त्यांना शिवसेनेचे काटे बघायचे आहेत,असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. ज्यांना मोठे केले ते सोबत नसले तरी त्यांना मोठे करणारे माझ्यासोबत आहेत.आतापर्यंत त्यांनी गुलाब पाहिले,आता काटे पाहा.गुलाबाचे झाड माझ्याकडे आहे, पुन्हा नवीन गुलाब फुलवीन,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आजपर्यंत अनेकदा शिवसेना फोडण्याचे प्रयत्न झाले,पण आता शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.बंड याआधीही झाले असून मी त्यांना सामोरे गेलो आहे. हे बंड थंड करण्याची ताकद माझ्याकडे आहे.कायद्याची लढाई सुरू आहे.त्या लढाईत आपले वकील किल्ला लढवत असून,न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे. तेव्हा तिस-या लढाईसाठी सदस्य नोंदणीवर भर द्या असे आवाहन देखिल त्यांनी यावेळी शिवसैनिकांना केले.

राज्यात काल नागपंचमी साजरी करण्यात आली.असे बोलतात की नागाला कितीही दूध पाजले तरी तो चावतोच.या सर्वांनाही निष्ठेचे दूध पाजले,पण ही औलाद गद्दार निघाली. पण यांना गद्दार बोलताना बैलाचा उल्लेख करू नका,कारण बैलाला त्रास होईल. बैल हा शेतक-यांचा राजा आहे, अशा शब्दांत त्यांनी बंडखोरांना फटकारले. जो काही सोक्षमोक्ष व्हायचा असेल तर होऊन जाऊ द्या, विधानसभेच्या निवडणुका घ्या, मग दाखवून देऊ, असे आव्हानही ठाकरे यांनी बंडखोरांना दिले.यावेळी त्यांनी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला.राजकारणात विजय आणि पराभव होत असतो,पण आता शिवसेना संपवण्याची भाषा केली जात आहे. त्यांना माहिती नाही,शिवसेनेने अशी आव्हाने पायदळी तुडवत त्यावर झेंडा रोवलाय.आता आपली लढाई तीन पातळ्यांवर सुरू आहे. एक रस्त्यावरील लढाई आहे, त्यात आपण कमी पडणार नाही. दुसरी लढाई कोर्टात सुरू आहे आणि तिसरी लढाईही तेवढीच महत्त्वाची आहे. ती लढाई म्हणजे शपथपत्राची. हा विषय खूप गंभीर आहे. तेव्हा शपथपत्रे गोळा करा, सदस्य नोंदणी करा,या लढाईत खंबीरपणे पाय रोवून उभे राहा, असे आवाहन त्यांनी केले.

Previous articleगद्दारांचं सरकार टिकणार नाही,हिम्मत असेल तर राजीनामा देवून निवडणुकीला सामोरे जा
Next articleशिंदे सरकारचा मोठा निर्णय : जिल्हा परिषदेतील सदस्यांची संख्या कमी होणार