मुंबई नगरी टीम
मुंबई । मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले आशिष शेलार यांची मुंबई भाजपा अध्यक्षपदी तर प्रदेशाध्यपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे तर चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि विदर्भातील नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागल्याने त्यांच्या जागी भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून विदर्भातील भाजपचे नेते आणि प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी देण्यात आली आहे.मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी भाजपकडून संधी देण्यात आल्याने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपा अध्यक्षपदी माजी मंत्री आणि आमदार आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.युती सरकारमध्ये मंत्री असतानाही गेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती.मात्र नुकत्याच झालेल्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांना पक्षाने संधी दिली.