शिंदे फडणवीसांना सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

गुजरातची निवडणूक तोंडावर आल्याने महाराष्ट्रातील भाजप गुजरातचे हित जपण्यात व्यस्त असल्याचे दिसत असून महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल राज्यातील सुशिक्षित, बेरोजगार तरुणांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का? असा संतप्त सवालही जयंत पाटील यांनी केला आहे. वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे २० बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे. सुमारे एक लाख इतकी रोजगारक्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावला आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.महाविकास आघाडीने या गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला होता. या कंपनीच्या शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती याची आठवणही जयंत पाटील यांनी ट्विटवरुन करुन दिली आहे.

Previous articleमहाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यास खोके सरकारला इच्छा नाही : आदित्य ठाकरे शिंदे सरकारवर बरसले
Next articleडोळे काढण्याची, हायपाय तोडण्याची भाषा करणा-या खासदार आमदारांवर कारवाई करा