मुंबई नगरी टीम
नागपूर । राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मध्ये एकही राज्यमंत्री नसताना हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरातील राज्यमंत्र्यांसाठी असणा-या बंगल्यावर कोट्यवधीची उधळण कशासाठी करण्यात आली असा मुद्दा शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू यांनी विधानसभेत उपस्थित केला.त्यावर चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनिल प्रभू यांना मंत्रीपदाची ऑफर दिल्याने सभागृहात एकच हंशा पिकला.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सध्या केवळ १८ मंत्री असून मंत्रिमंडळात एकही राज्यमंत्री नाहीत.अधिवेशनामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता होती.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दिल्ली दौ-यामुळे अधिवेशनाच्या काही दिवस अगोदर हा विस्तार होणार अशी चर्चा होती. मात्र विस्तार पुन्हा लांबणीवर पडल्याने गुडघ्याला बांशिंग बांधलेल्या इच्छूकांनी निराशा झाली असताना यावरून शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू यांनी सभागृहात चिमटा काढला.मंत्रिमंडळात एकही राज्यमंत्री नसताना नागपूरात राज्यमंत्र्यांनी असणा-या बंगल्यावर कोट्यवधीची उधळण कशासाठी करण्यात आली असा सवाल प्रभू यांनी केला.मोठ्या प्रकल्पांसाठी कर्ज घेतले असताना पैशांचा गैरवापर का करण्यात येत आहे अशी विचारणा त्यांनी केली.यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तार हा कधीही एवढेच काय अधिवेशन चालू असतानाही केला जावू शकतो असे सांगून तुमची मंत्रिमंडळात येण्याची इच्छा आहे का असा उलट सवाल प्रभू यांना करताच सभागृहात एकच हंशा पिकला.