रिपब्लिकन पक्षासाठी दोन जागा सोडा : रामदास आठवले
मुंबई नगरी टीम
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष राज्यात २ जागा लढविणार असल्याचा निर्णय आज रिपाइंच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यासाठी शिवसेना भाजप युतीने प्रत्येकी एक जागा रिपब्लिकन पक्षाला सोडावी असा ठराव आज करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले दिली.
शिवसेना भाजपने युतीचा निर्णय घेताना रिपब्लिकन पक्षाला विश्वासात घेतले नाही तसेच युती जाहीर करताना रिपब्लिकन पक्षाला सन्मानाने निमंत्रित केले नाही यामुळे देशभरातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये नकारात्मक संदेश गेला असून, युतीबाबत रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी या बैठकीत व्यक्त करण्यात आली. नाराजी असली तरी आगामी निवडणूक स्वबळावर लढणे किंवा अन्य तिसरी चौथी आघाडी उभारणे या पर्यायांचा विचार न करता भाजप शिवसेना युती सोबत एनडीए मध्येच राहून लोकसभा निवडणूक दोन जागांवर लढण्याचा निर्णय आज झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या बैठकीत घेतला असल्याचे आठवले यांनी सांगितले.
आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षासाठी मुंबईतून दक्षिण मध्य मुंबई किंवा ईशान्य मुंबई या दोन पैकी एक जागा तसेच सोलापूर ;लातूर; रामटेक या तीन पैकी एक जागा अश्या एकूण ४ पैकी दोन जागा रिपब्लिकन पक्षाला भाजप शिवसेना युती सोडाव्यात याबाबत चा प्रस्ताव भाजप ला देण्यात येणार असल्याचा निर्णय आजच्या रिपाइं च्या बैठकीत घेण्यात आला