आज शिवसेना भाजप आमदारांचे वर्षा बंगल्यावर “ स्नेहभोजन”

आज शिवसेना भाजप आमदारांचे वर्षा बंगल्यावर “ स्नेहभोजन”

मुंबई नगरी टीम

मुंबई :  गेली साडे चार वर्षे एकमेकांवर टीकास्त्र सोडणा-या शिवसेना आणि भाजपमध्ये युतीची घोषणा करण्यात येवूनही भाजप  आणि  शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून थेट युती तोडण्याची भाषा  झाल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांतील आमदारांच्या मनोमिलनासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आज रात्री स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

सत्तेत असूनही भाजपवर सडकुन टीका करणा-या आणि स्वबळाचा नारा देणा-या शिवसेनेशी युती करण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांना मातोश्रीवर जावे लागले होते. त्यानंतर गेली साडे चार वर्षे दुभंगलेली युती पूर्वपदावर योतानाच अनेकांचा जीव भांड्यात पडला. भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली असतानाही मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांमध्ये जुंपली असतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दोन मंत्र्यांना अप्रत्यक्षरित्या तंबी दिल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुका या युतीने लढविण्यासाठी दोन्ही पक्षातील आमदारांमध्ये असलेली कटुता संपुष्टात आणण्यासाठी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुखांनी तेट स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

आज रात्री साडे सात वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेना आणि भाजपच्या सर्व आमदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या  स्नेहभोजनाला  स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आजच्या पंगतीलाही अत्यंत महत्त्व आले आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे उपस्थित शिवसेना-भाजप आमदारांना मार्गदर्शनही करणार आहेत.

Previous articleविरोधकांचा राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार
Next articleरिपब्लिकन पक्षासाठी दोन जागा सोडा : रामदास आठवले