दुष्काळी उपाययोजना आणि नोकरभरतीत सरकार अपयशी: विखे पाटील
मुंबई नगरी टीम
मुंबई : दुष्काळी उपाययोजना आणि नोकरभरतीत भाजप शिवसेनेचे सरकार साफ अपयशी ठरले असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे अधिवेशन स्थगीत झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी विखे पाटील म्हणाले की, राज्याच्या अंतरीम अर्थसंकल्पावरील चर्चेत दुष्काळाची भयावहता, त्यासंदर्भात करावयाची उपाययोजना आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यात सरकारला आजवर आलेले अपयश यावर आम्ही उहापोह करणार होतो. पण अधिवेशन स्थगीत झाल्यामुळे ही चर्चा होऊ शकली नाही. अर्थसंकल्पीय चर्चेतील माझे भाषण मी सभागृहाच्या पटलावर ठेवले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना २ हजार रूपये देण्याच्या घोषणेतील फोलपणा, एनडीआरएफकडून राज्याला आजवर एक दमडीही न मिळणे, राज्य सरकारकडून दिली जाणारी तुटपुंजी मदत, चारा छावण्यांची आवश्यकता, पाण्याची टंचाई, रोजगाराची उपलब्धता नसणे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होणे, अशा अनेक मुद्यांकडे भाषणातून सरकारचे लक्ष वेधल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी ७२ हजार पदांच्या मेगाभरतीची घोषणा करून आता एक वर्ष झाले. पण अजून एकाही बेरोजगाराला नोकरी मिळालेली नाही. २४ हजार शिक्षकांच्या भरतीचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून कायम आहे. या सरकारकडून सातत्याने त्यांची फसवणूक होते आहे. भरतीच्या केवळ खोट्या घोषणा केल्या जात आहेत. हा मुद्दासुद्धा मी या भाषणाच्या माध्यमातून सरकारच्या निदर्शनास आणून दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात सरकारकडून फसवणूक होत असल्याचे देखील मी या भाषणामध्ये नमूद केले आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले.
तत्पूर्वी विधानसभेत बोलताना त्यांनी पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय वायुदलाचा वीरवैमानिक अभिनंदन वर्थमान याला तातडीने मायदेशी आणण्याकरिता केंद्र सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी केली. देशाची सुरक्षा अधिक महत्वाची असल्याने अधिवेशन स्थगीत करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाचा आपण आदर केल्याचेही त्यांनी सांगितले