आणि जयंतरावांच्या पत्रकार परिषदेला चंद्रकांतदादांनी हजेरी लावली

आणि जयंतरावांच्या पत्रकार परिषदेला चंद्रकांतदादांनी हजेरी लावली

मुंबई नगरी टीम

मुंबई :  विधानसभेत आज जयंत पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली व बालेवाडीतील देवस्थान जमिनीचा गैरव्यवहार प्रकरण काढून  महसुलमंत्र्यांनी  राजीनामा द्यावा व या दोन्ही गैरव्यवहाराची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी केली होती.या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी जयंत पाटील यांची विधानभवनातील पत्रकार कक्षात पत्रकार परिषद सुरू असतानाच राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील या ठिकाणी आले आणि त्यांनी चक्क जयंतरावांच्या समोरील सोफ्यावर बैठक मारून जयंतरावांच्या पत्रकार परिषदेला हजेरी लावली.

जयंत पाटील पुणे जिल्ह्यातील हवेली व बालेवाडीतील देवस्थान जमिनीचा गैरव्यवहार सभागृहात मांडला. त्यामध्ये कोणाचेही नाव न घेता फक्त महसुलमंत्र्यांचा उल्लेख केला. परंतु यावरून सभागृहात गदारोळ होवून याला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हरकत घेतल्यानंतर हे प्रकरण सभागृहाच्या पटलावरुन काढून टाकण्याची घोषणा विधानसभा अध्यक्षांनी केली. त्यानंतर या प्रकरणाची सविस्तर माहिती पत्रकारांना देण्यासाठी जयंतराव पाटील यांनी विधानभवनातील पत्रकार कक्ष गाठले आणि पत्रकारांना माहिती देण्यास सुरूवात केली. जयंतरावांची पत्रकार परिषद सुरू असतानाच त्या ठिकाणी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील आले. चंद्रकांतदादांचे पत्रकार कक्षात आगमन होताच जयंतराव आणि चंद्रकांतदादा यांच्यात नजरानजर झाली.त्याठिकाणी उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने चंद्रकांतदादांना पत्रकार कक्षातील दुस-या कक्षात बसण्याची विनंती केली मात्र चंद्रकांतदादांनी दुस-या कक्षात न जाता जयंतराव यांच्या समोरील सोफ्यावर बसून त्यांची पत्रकार परिषदेतील मुद्दे ऐकून घेतले.जयंतराव यांची पत्रकार परिषद संपताच त्याच ठिकाणी चंद्रकांतदादांनी पत्रकार परिषद घेवून जयंतरावांचे आरोप खोडून काढले. लोकसभा आणि इस्लामपूर मधिल पराभवामुळे जयंतराव असे आरोप करीत असल्याची टीका चंद्रकांतदादांनी यावेळी केली.

Previous articleकोकणातील शिक्षक भरतीत स्थानिकांनाच सामावून घ्या
Next article“त्या” चॅनलला बिनशर्त माफीनामा मागावा लागणार : हक्कभंग समितीचा आदेश