उरलेली पत वाचवण्यासाठी अशोक चव्हाणांनी निवडणूक लढवू नये

उरलेली पत वाचवण्यासाठी अशोक चव्हाणांनी निवडणूक लढवू नये

मुंबई नगरी टीम

नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण लोकसभा निवडणूकीस पराभूत झाले. आता आपली उरलीसुरली पत वाचवण्यासाठी त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवू नये, असा सल्ला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिला आहे. तसेच राज्यात कुठल्याही मतदारसंघात उभे राहिले तरी ते पराभूत होतील, असेही तावडे यांनी येथे सांगितले.

विधानसभा निवडणूकांच्या तयारीसाठी भाजपच्या वतीने राज्यामध्ये सात विभागीय केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज नांदेड व औरंगाबाद येथील विभागीय माध्यम केंद्रांना भेट दिली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते नांदेड येथे बोलत होते.राज्यात शिवसेना-भाजपा युती होणारच असा विश्वास  तावडे यांनी व्यक्त केला. जागा वाटपाचा तिढा दोन दिवसात सुटेल. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. गेल्या पाच वर्षात सरकारने केलेल्या कामाची पावती लोकसभेप्रमाणेच यावेळीही मिळणार, त्यामुळे गतवेळेस पेक्षा जास्त जागा महायुतीला मिळतील. काँग्रेस व राष्ट्रवादीची अवस्था केविलवाणी झाली असून, वंचित बहुजन आघाडी हा आगामी विरोधी पक्ष असेल, या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची त्यांच्याच जिल्ह्यात वाताहत झाली. आता त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवू नये आणि आपली उरली सुरली पत घालवू नये, असा सल्ला आपण देत आहोत, असेही तावडे म्हणाले.माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघापैकी कुठल्याही मतदारसंघात उभे राहिले, तरी ते पराभूतच होतील, असे भाकीतही तावडे यांनी केले. लोकसभेच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे मतदारांनी महायुतीवर विश्वास दाखविला त्याप्रमाणेच या निवडणुकीत मतदार महायुतीसोबत असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Previous articleशिवस्मारकावरून भाजपा काँग्रेस राष्ट्रवादीत कलगीतुरा
Next articleआयात उमेदवार देणाऱ्या भाजपने फुकटचा सल्ला देऊ नये