रत्नागिरीतून शिवसेना उमेदवार उदय सामंत लाखाच्या फरकाने विजयी होणार ?
मुंबई नगरी टीम
रत्नागिरी : विधानसभा निवडणूकीच्या मतदानानंतर विविध खासगी वृत्तवाहिन्यांवर मतदानोत्तर चाचणी कल घोषित करण्यात आले आहेत.यामध्ये राज्यात युतीला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेने जिल्ह्यात शिवसेनाच बाजी मारणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. सर्वसामान्य जनतेच्या अंदाजानुसार रत्नागिरीत शिवसेना आमदार उदय सामंत हे सुमारे १ लाख ३० हजाराच्या फरकाने विजयी होवून हॅटट्रिक करतील असे छातीठोकपणे बोलले जात आहे.
मतदानोत्तर चाचणी कल चाचण्यामध्ये राज्यामध्ये युतीला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या कल चाचणीत संपूर्ण राज्याचे चित्र स्पष्ट केले असले तरी संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात मात्र सर्वसामान्य जनतेने व्यक्त केलेला अंदाज समोर आला आहे.रत्नागिरीमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार आणि म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत हे सुमारे १ लाख ते १ लाख ३० हजाराच्या मताधिक्क्याने विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.कोकणातील विशेषकरून रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.या निवडणूकीत हा जिल्हा भगवामय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रत्नागिरीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला सुमारे १२ हजार ते १८ हजार मते मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.तर दापोली मतदारसंघात शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कांटे कि टक्कर होवून येथून काही हजाराच्या मतांनी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होण्याची दाट शक्यता आहे.गुहागर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सुमारे ३० ते ४० हजार मतांनी विजयी होतील असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे. चिपळूण मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मोठी चुरस असून येथून काही हजाराच्या फरकाने शिवसेनेच्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता वर्तवली जात आहे. तर काहींच्या अंदाजानुसार या मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.राजापूर मतदारसंघात शिवसेना उमेदवार राजन साळवी सुमारे २० ते ४० हजार मताधिक्याने विजयी होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.