निकालापूर्वीच भाजपची “जल्लोषाची” तयारी

निकालापूर्वीच भाजपची “जल्लोषाची” तयारी

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकांचा निकाल परवा म्हणजे गुरूवारी २४ तारखेला लागणार असला तरी विविध खाजगी वृत्त वाहिन्यांनी वर्तविलेल्या अंदाजाच्या आधारावर भाजपाने विजयी जल्लोष करण्याची तयारी सुरू केली आहे. प्रदेश भाजपच्यावतीने मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे प्रदेश कार्यालयाच्या बाहेर मंडप आणि व्यासपीठ उभारण्यासाठी परवानगी मागितली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणूकीत शिवसेनेशी युती करूनही राज्यातील जनता भाजपला मोठे जनमत देणार असल्याचे अंदाज काल मतदान झाल्यानंतर विविध वृत्त वाहिन्यांवर व्यक्त करण्यात आले आहेत. अनेक वाहिन्यांनी भाजपला १२२ ते १३० जागा मिळणार असल्याचा तर काही वाहिन्यांनी भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.विविध वाहिन्यांच्या अंदाजानुसार भाजपलाच जनमताचा आधार मिळणार असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. याचाच आधार घेत भाजपने मतमोजणीच्या दिवशी गुरूवारी राज्यभरात जल्लोष करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर विजयाचा जल्लोष करण्यात येणार आहे. त्यासाठी भाजपने मुंबई महानगरपालिकेकडे परवानगी मागितली आहे. भाजप प्रदेश कार्यालयाच्यावतीने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांना एका पत्राद्वारे परवानगी मागण्यात आली आहे. विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर नरीमन पॅांईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयाच्या बाहेरील फुटपाथ व त्या परिसरात  मंडप व व्यासपीठ उभारण्यात अनुमती द्यावी अशी या पत्रात मागणी करण्यात आली आहे.

प्रदेश कार्यालयाच्या बाहेर व्यासपीठ उभारून सजावट करण्याचा पक्षाचा मनोदय असून, त्या ठिकाणी विजयी उमेदवारांचे स्वागत व अभिनंदन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचे भाजपाच्या पत्रात म्हटले आहे.

Previous articleया पुढे मी निवडणूक लढवणार नाही
Next articleरत्नागिरीतून शिवसेना उमेदवार उदय सामंत लाखाच्या फरकाने विजयी होणार ?