मुंबई नगरी टीम
मुंबई : कोकणातील विद्यार्थ्यांना सोईचे व्हावे यासाठी मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सिंधुदुर्गला सुरू करण्यात येणार आहे. या उपकेंद्राला स्वतंत्र संचालक येत्या दोन महिन्यात नेमण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.
भाजपाचे सदस्य निरंजन डावखरे यांनी कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती.या लक्षवेधीला उत्तर देताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत बोलत होते.कोकण विद्यापीठासंदर्भात तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.यात समितीमध्ये प्राचार्य, पालकांचा समावेश करण्यात आला आहे. येत्या काळात विद्यार्थी या सर्व प्रक्रियेचा केंद्रबिंदू असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचाही यात समावेश केला जाणार आहे.कोकण विद्यापीठाचा निर्णय हा विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांचा कल पाहून घेतला जाणार आहे. भविष्यात कोकण विद्यापीठाची निर्मिती झाल्यास या समितीमध्ये रायगडचा समावेश केला जाणार नाही. केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाचे रत्नागिरी येथील उपकेंद्र अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले.