सरकारकडून धान्य वाटपाची गोलमाल आकडेवारी

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबईसह राज्यावर कोरोनोचो संकट असताना महाविकास आघाडीचे सरकार मात्र पुन्हा एकदा आकडेवारीचा गोलमाल करित असल्याचे स्पष्ट होत आहे असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, १ कोटी ३५ लाख ५४ हजार लोकांना चे ४३ लाख ६० हजार धान्य वाटप करण्यात आले. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मात्र ट्विटर च्या माध्यमातून ३८ हजार क्विंटलचे धान्य साधारण ५ कोटी ९ लाख लोकांना वाटण्यात आल्याची  आकडेवारी सांगत आहेत. त्याचवेळी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून मात्र सांगण्यात आले की, छगन भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार ४४ लाख क्विंटल धान्य साधारण ६ कोटी ८० लाख लोकांना वाटप करण्यात आले आहे. या वरुनच नेते व मंत्री यांच्यामध्ये विसंवाद दिसून येत आहे अशी टिकाही दरेकर यांनी केली आहे.

धान्य वाटपाची खोटी आकडेवारी जनतेला देण्याचा प्रयत्न होत असून राज्यातील कोटयवधी जनतेची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे जर ही आकडेवारी खरी मानली व आपण शासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून एवढे धान्य पाठविले  तर धान्यासाठी ठिकठिकाणी जनतेचा आक्रोश का  होत आहे असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आपले धान्यांनी भरलेले ट्रक व टेम्पो कुठे गेले याचा हिशोब जनतेला दिला पाहिजे, कारण आजही लोकांना धान्य मिळत नाही, केशरी रेशन कार्ड असलेल्यांनाही धान्य मिळत नाही. अन्य राज्यांप्रमाणे ज्यांची रेशन कार्ड नाहीत त्यांना सरसकट धान्य मिळत असेल तर महाराष्ट्रातील जनतेला ते धान्य का मिळत नाही. ते मिळाले पाहिजे व प्रत्यक्षात धान्याचा आकडा जनतेसमोर आला पाहिजे अशी मागणी दरेकर यांनी केली.

Previous articleठाकरे सरकारचा दिलासा;बांधकाम कामगारांच्या खात्यात दोन हजार रूपये जमा होणार
Next articleसोमवारपासून वर्तमानपत्रे सुरू होणार ; मात्र घरोघर वितरणावर बंदी