मुंबई नगरी टीम
नवी दिल्ली : मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर काही नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा पर्याय सुचवला आहे. पंरतु मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायला हवे, असे भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.ओबीसी समाजाने मराठा समाजाला आरक्षणासाठी जागा द्यावी, ही आमच्या पक्षाची भूमिका नाही. तर कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण दिल्याने त्याचे परिणाम काय होतील याचा विचार सरकारने करायला हवा, असा सूचक इशाराही रावसाहेब दानवे यांनी दिला आहे.
एका वृत्तवाहिनीशी साधलेल्या संवादात त्यांनी याबाबत भाष्य केले आहे. “पूर्वीचे मराठा समाजाला दिलेले आरक्षण ते आमच्या सरकारने दिलेले होते. कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण दिलेले नाही. ओबीसी, एससी, एसटी अशा कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी केलेले नाही. कोणत्याही समाजावर अन्याय न करता हे आरक्षण दिले होते. आता जर का हे सरकार एखाद्या समाजाचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण देणार असेल. तर, त्याचे काय परिणाम होतील हे त्या सरकारने पाहिले पाहिजे”, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले.
ओबीसी समाजाने मराठा समाजाला आरक्षणासाठी जागा द्यावी,ही आमच्या पक्षाची भूमिका नाही. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला दिले होते तेच आरक्षण या सरकारने सर्वोच्च न्यायालयात टिकवले पाहिजे ही आमची भूमिका असल्याचे रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्य सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. तर आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सरकारने पूर्ण प्रयत्न केले तरच मराठा समाज शांत होईल. अन्यथा त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा रावसाहेब दानवे यांनी दिला आहे.