शरद पवारांचे राज्यपालांना पुन्हा पत्र,या घटनांचा उल्लेख करीत काढला चिमटा

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात पत्रव्यवहाराद्वारे रंगलेला शाब्दिक वाद सर्वांनीच पाहिला.तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांना खरमरीत पत्र लिहत पुन्हा या चर्चेला तोंड फोडले आहे.राज्यपालांनी शरद पवारांना कॉफी टेबल पुस्तक पाठवले आहे.यावर आपला अभिप्राय कळवत शरद पवारांनी राज्यपालांना पत्र लिहले. यामध्ये शरद पवारांनी भगतसिंह कोश्यारी यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्र्यांना दिलेला सल्ला आणि त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलेली नाराजी याचा उल्लेख करत राज्यपालांना चिमटा काढला आहे.

“भारतीय संविधानात जनराज्यपाल असा उल्लेख आढळत नाही, तरीही राज्य शासनाच्या वतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारे स्वप्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आले याबद्दल धन्यवाद.पुस्तकाचे अवलोकन केले असता त्यामध्ये आपल्या मर्यादित कालावधीतील एखाद-दुसरा प्रसंग वगळता शपथविधी स्वागत समारंभ दीक्षांत समारंभ सोहळे,उच्चपदस्थ गाठीभेटी सांस्कृतिक कार्यक्रम छायाचित्र आहेत.तसेच निधर्म वादासंदर्भात राज्याच्या मा. मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची आणि त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही,” अशी आठवण करू देत शरद पवारांनी टोला लगावला आहे.

राज्यातील मंदिरे खुली करण्यासंदर्भात भाजपकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आले होते. यादरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरे खुली करण्याच्या मागणीसंदर्भात पत्र पाठवले होते. मात्र राज्यपालांनी यामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही, अशा कडक शब्दांत सुनावले होते. त्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून राज्यपालांच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त करण्यात आली. शरद पवार यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहत याची दखल घेण्यास सांगितले. शेवटी गृहमंत्री अमित शहा यांनी या सर्व प्रकरणावर भाष्य करत राज्यपालांनी असे शब्द वापरायला नको होते, असे म्हणत नाराजी व्यक्त केली होती.

Previous articleनियुक्त्यांच्या नावाखाली ४०० कोटींचा गैरव्यवहार ; फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
Next article‘कोरोना-गो’चा घेतला ज्याने वसा… गृहमंत्र्यांकडून आठवले स्टाईल सदिच्छा