‘कोरोना-गो’चा घेतला ज्याने वसा… गृहमंत्र्यांकडून आठवले स्टाईल सदिच्छा

मुंबई नगरी टीम

मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रामदास आठवले हे लवकर बरे व्हावे यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्याच काव्यात्मक अंदाजात सदिच्छा दिल्या आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी गो कोरोना हो, अशा घोषणा रामदास आठवले यांनी दिल्या होत्या. त्याच पद्धतीच्या सदिच्छा आज गृहमंत्र्यांनी दिल्या आहेत.

“कोरोना-गो’चा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच कविमित्र रामदासा, धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका, कोरोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का”, असे ट्वीट करत अनिल देशमुख यांनी आठवले यांना लवकर बरे व्हा, अशा सदिच्छा दिल्या आहेत. मंगळवारी आठवलेंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यांची प्रकृती उत्तम असून खबरदारी म्हणून ते खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच आठवले यांच्या पत्नी सीमा यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. रामदास आठवले लवकर बरे व्हावे यासाठी राजकीय वर्तुळातून अनेकांनी त्यांना सदिच्छा दिल्या आहेत.

रामदास आठवले हे आपल्या काव्यात्मक अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा त्यांनी आपल्या संसदेतील भाषणात देखील कविता सादर करत श्रोत्यांची मने जिंकली. दरम्यान,कोरोनाचा प्रादुभार्व हळूहळू वाढत असताना रामदास आठवले यांनी जनजागृतीसाठी काही परदेशी नागरिकांसह ‘गो कोरोना गो’ अशा घोषणा दिल्या होत्या. हातात बॅनर घेऊन आठवले यांनी या घोषणा दिल्या होत्या. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यावरून काहींनी आठवलेंची खिल्ली देखील उडवली तर आजही हा गो कोरोना गोचा नारा अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने वापरताना दिसतात.

Previous articleशरद पवारांचे राज्यपालांना पुन्हा पत्र,या घटनांचा उल्लेख करीत काढला चिमटा
Next articleऊर्जामंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय;दळणवळण क्षेत्रासाठी ठरणार फायदेशीर