आजपासून कोल्हापूर जिल्ह्यात “फक्त एकच गट तो म्हणजे उद्धव गट”

मुंबई नगरी टीम

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात यापुढे कोणत्याही गटबाजीला थारा देणार नाही जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तार करायचा असेल तर आपली वज्रमूठ बनवली पाहिजे असे आवाहन करतानाच आजपासून जिल्ह्यात फक्त एकच गट असेल तो म्हणजे उद्धव गट,असा स्पष्ट इशारा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे संपर्क प्रमुख उदय सामंत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिला.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची नुकतीच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे.या नियुक्ती नंतर कोल्हापूर मध्ये झालेल्या शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.आज झालेल्या मेळाव्यात मंत्री सामंत यांचा कोल्हापूरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भव्य सत्कार केला.माझे शिक्षण कोल्हापुर मध्ये झाले आहे.मी पक्ष निरीक्षक म्हणून कोल्हापुर मध्ये काम केले असल्याने कोल्हापूरातील जनतेशी आणि येथील मातीशी माझे वेगळेच ऋणानुबंध आहेत. कोल्हापूरात शिवसेनेची मोठी ताकद आहे.गेल्या विधानसभेत कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेनेचे सहा आमदार निवडून गेले होते.मात्र काही तात्कालिक राजकीय कारणांमुळे यावेळेस एकच आमदार आहे.पक्ष विस्तार अधिक व्यापक करण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन वज्रमूठ बनवावी लागेल असे आवाहनही मंत्री सामंत यांनी यावेळी पदाधिका-यांना केले.

सत्ता आणि संघटना या माध्यमातून जनतेमध्ये शिवसेनेबद्दल विश्वास निर्माण करावा लागेल. म्हणूनच यापुढे गटबाजीला थारा देणार नाही असेही त्यांनी सांगितले.आपण सगळे शिवसैनिक असल्याने आता आमचं ठरलंय आता जिल्ह्यामध्ये केवळ उद्धव गट असेल, असे सामंत यांनी पदाधिका-यांना सांगितले. आज झालेल्या पदाधिकारी मेळाव्याला जिल्हाप्रमुख संजय पवार,विजय देवणे,खासदार धैर्यशील माने,आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार उल्हास पाटील डॉ.सुजित मिणचेकर,चंद्रदीप नरके यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleतेव्हाचे मुख्यमंत्री मला पंतप्रधान कार्यालयात घेवून गेले होते : केसरकरांचा गौप्यस्फोट
Next articleविधानपरिषद निवडणूकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी विरूद्ध भाजप सामना रंगणार