मुंबई नगरी टीम
नाशिक : आज नाशिकमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली होती.यावेळी दोघांमध्येही चांगलीच जुगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळाले.हे पाहून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तसे पाहायला गेले तर राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू असलेली धुसफूस काही नवी नाही. त्यामुळे समोरासमोर आल्यावर राज्यपाल आणि सत्ताधारी एकमेकांना टोले मारण्याची हातची संधी काही सोडताना दिसत नाहीत.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या नूतनीकरणाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान दोघांनीही एकमेकांना कोपरखळ्या मारल्या. राज्यपालांच्या उपस्थितीत येत्या दोन वर्षात सर्व इमारती बांधा, असा चिमटा छगन भुजबळ यांनी काढला असता त्याला राज्यपालांनी लगेच उत्तर दिले. तब तक क्या सिन रहेगा? या राज्यपालांच्या प्रश्नाला उत्तर देताना, हम तब भी आपके साथ ही रहेंगे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. त्यामुळे उपस्थितामध्ये एकच हशा पिकला.
आजच्या या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी देखील उपस्थिती लावली होती. राज्यपालांनी एकीकडे छगन भुजबळ यांना टोला लगावला तर दुसरीकडे अमित देशमुख यांचे कौतूकही केलेले पाहायला मिळाले. खरा लीडर हा आपत्कालीन परिस्थितीत लक्षात येतो. अमित देशमुख आणि कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसकर यांनी परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम भूमिका घेतली, ती कौतुकास्पद असल्याचे राज्यपालांनी म्हटले. दरम्यान, राज्यात अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत वाद रंगला होता. कोरोना काळात परीक्षा घेऊ नये, अशी राज्य सरकारची भूमिका होती. तर परीक्षा घ्याव्यात, असे राज्यपालांचे ठाम मत होते. त्यामुळे या मुद्द्यावरून राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात खटके उडताना पाहायला मिळाले होते.