मुंबई नगरी टीम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनेतील नेत्यांनाच भेटत नाहीत त्यांचे फोनही उचलत नाहीत,अशा शिवसेनेच्या नेत्यांच्या तक्रारी आहेत.शिवसेनेतील ही अंतर्गत धुसपुस समोर येत असतानाच भाजप नेते निलेश राणे यांनी संधी साधत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.मुख्यमंत्री केवळ आपल्या भाषणातच शिवसैनिक आपला श्वास असल्याचे म्हणतात.परंतु प्रत्यक्षात त्यांचा साधा फोनही उचलत नाहीत, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटले की, “मुख्यमंत्र्यांना ५० फोन करून सुद्धा फोन उचलत नाही आणि भेटत नाही अशी एका शिवसेना आमदाराची तक्रार.एका शिवसेना आमदाराची अशी परिस्थिती असेल तर सामान्य शिवसैनिकांची अवस्था किती बिकट असेल ह्यावरून लक्षात येतं. फक्त भाषणातून सांगायचं शिवसैनिक माझा श्वास आहे नंतर शिवसैनिक फाट्यावर”, अशा शब्दांत निलेश राणे यांनी टीका केली आहे.दरम्यान, शुक्रवारी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री दर्जा असणारे किशोर तिवारी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. विदर्भ आणि मराठवाडा यांचा अनुशेष दूर करावा, अशी मागणी त्यांनी राज्यपालांना केली. तसेच अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी घोषित करण्यात आलेली १० हजार कोटींची मदत ही पुरेशी नाही. यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची भेट झाली, अशी तक्रार यावेळी तिवारी यांनी केली.
गेल्या चार दिवसांपासून किशोर तिवारी हे मुंबईत आहेत.मात्र त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट झाली नाही. अखेर तिवारी यांनी राजभवनाचे दार ठोठावले. आणखी एका वृत्तानुसार अमरावतीचे आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदर नवनीत राणा यांनीही मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांची भेट झाली नाही. इतकंच नव्हे तर 50 वेळा फोन करूनही मुख्यमंत्र्यांनी त्यावर काहीच उत्तर न दिल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, सत्ताधारी पक्ष सोडून आतापर्यंत राजभवनात झालेल्या भेटीगाठी या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. मात्र आता शिवसेनेतील नेतेही राजभवनावर जाऊन मदतीची अपेक्षा करत असल्याने राजकीय वर्तुळात नवी चर्चा रंगली आहे. अशातच नुकत्याच पाठवलेल्या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावाच्या यादीत शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये नाराजी सूर उमटत असल्याची चर्चा आहे. याच मुद्द्यांवरून भाजप आता शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करत आहे.