मुंबई नगरी टीम
मुंबई : येत्या ७ डिसेंबर पासून नागपूर मध्ये होणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याच्या शक्यतेमुळे नागपूर ऐवजी आता मुंबईत होणार आहे. आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.तर आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर मध्ये घेण्यात यावे अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे.
दरवर्षी नागपूर मध्ये होणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे यंदा रद्द करण्यात आले असून,आता हे अधिवेशन मुंबईत होणार आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली या बैठकीत येत्या ७ डिसेंबर पासून नागपूरात होणारे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नागपूरात पडणारी थंडी आणि अधिवेशनासाठी होणारी गर्दी पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आणि नागपूरातील आमदार निवासाचा वापर क्वारंटाईन सेंटरसाठी करण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.नुकतेच झालेले दोन दिवसाचे पावसाळी अधिवेशन कोरोनाचे काटेकोरपणे पालन करून पार पडले होते.त्यामुळे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यावर या बैठकीत एकमत झाले.देशात आणि राज्यावर असलेले कोरोनाचे संकट आणि राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता नागपूरऐवजी हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.अनेक विधिमंडळ सदस्यांनी नागपूर येथे कोविडच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन घेणे उचित होणार नाही अशा सूचना यावेळी केल्या.
मुंबईत होणारे हिवाळी अधिवेशनाचे कामकाज किमान दोन आठवड्याचे करण्यात यावे अशी मागणी विरोधी पक्षाने केली.तर पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नागपूर मध्ये घेण्यात यावे अशी मागणी भाजपचे नेते गिरिश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.येत्या ७ डिसेंबरपासून मुंबईत होणा-या अधिवेशनाच्या कामकाजाचा कालावधी आजच्या बैठकीत ठरविण्यात आला नसला तरी कामकाज ठरविण्यासाठी येत्या १ डिसेंबर रोजी पुन्हा कामकाज सल्लागार समितीचा बैठक होणार आहे.तर या हिवाळी अधिवेशनात विरोधांनी चर्चा करू नये म्हणून सत्ताधारी पळ काढण्याची प्रयत्न करीत असल्याची टीका महाजन यांनी केली आहे.परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सरकारला शेतीच्या आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करायची नाही असे वाटते असे सांगतानाच प्रत्येक वेळी मुख्यमंत्री कोरोनाचे कारण देत असतील ते सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असल्याची टीका विखे पाटील यांनी केली.