मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात सध्या वाढीव वीज बिलांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. आचारसंहिता असल्याने माझी इच्छा असूनही मी यावर बोलू शकत नाही, असे वक्तव्य जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले होते. यावरून आता भाजप नेत्याने काहीतरी गडबड असल्याचे म्हणत संशय व्यक्त केला आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करताना जयंत पाटील यांनी शुक्रवारी पुण्यात केलेल्या वक्तव्याचा संदर्भ दिला आहे. “जयंत पाटील साहेबांसारखे ज्येष्ठ मंत्री पण आचारसंहितेचे कारण सांगून वीज बिलांसंदर्भात बोलायला टाळतात, म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे. गरिबांसाठी राज्य सरकार ५००० कोटी कर्ज घेऊ शकत नाही गी फालतुगिरी आहे”, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, कालही निलेश राणे यांनी वीज बिलांच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला होता.
आगामी पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी काल पुण्यात आढावा बैठकीला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना वीज बिलांच्या गोंधळावर भाष्य केले.विजेच्या थकबाकीची वसुली काशी करायची, नागरिकांना सवलती कशा व किती द्यायच्या, याकडे सरकार लक्ष देत आहे.आचारसंहिता असल्याने माझी इच्छा असूनही मी यावर उत्तर देऊ शकत नाही, असे विधान जयंत पाटील यांनी केले होते. हाच धागा पकडत निलेश राणेंनी प्रश्न उपस्थित केला आहे.