मुंबई नगरी टीम
मुंबई : शिरोमणी अकाली दल नेते खासदार प्रेम सिंग चंदू माजरा यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनाची माहिती दिली.शेतकरी आंदोलनादरम्यानच्या सर्व कार्यक्रमांना आपला पाठिंबा असेल.दिल्लीत दोन आठवड्यांनंतर होणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीलाही मुख्यमंत्री ठाकरे हजेरी लावणार असून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले अशी माहिती अकाली दलाच्या नेत्यांनी या भेटीनंतर दिली.
शिरोमणी अकाली दल नेते खासदार प्रेम सिंग चंदू माजरा यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा येथे भेट घेऊन दिल्लीतील शेतकरी आंदोलनाविषयी चर्चा केली.केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात असून त्या अनुषंगाने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.शेतकरी आपल्या देशाचा कणा असून त्यांच्या अडचणी व समस्यांचा विचार करणे व त्या सोडविण्यास आपण सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे असे चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री म्हणाले.शिरोमणी अकाली दल आणि शिवसेना हे दोन्ही यापूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक पक्ष होते.या कारणामुळे या दोन पक्षामध्ये मैत्रीचे संबंध आहेत. शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपाला वगळून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेने वर्षभरापूर्वी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना विरोध करताना शिरोमणी अकाली दलाने काही महिन्यांपूर्वी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनालत अकाली दलाचा सहभाग आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळवण्याचा आणि हे कायदे रद्द करण्यास भाग पाडण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा अकाली दलाचा प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर अकाली दलाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती केली.