मुंबई नगरी टीम
नाशिक : राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय प्रलंबित नसून हा प्रलंबित ठेवण्यात आला आहे,अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.१२ सदस्यांची नावे राज्यपालांना सोपवून तीन महिने होत आले तरी यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.घटनात्मक पदावर बसून घटनेचे मारेकरी म्हणून काम करत आहात का ? अशा शब्दांत संजय राऊतांनी राज्यपालांवर टीकास्त्र डागले.नाशिकमधील भाजपचे नेते वसंत गीते आणि सुनील बागूल यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी सदस्य नियुक्तीवर राज्यपालांवर निशाणा साधला.
यावर अधिक बोलताना संजय राऊत म्हणाले की,देशाच्या घटनेला काही लोक महत्त्व देताना आम्हाला ज्ञान देतात.जर राज्य आणि देश घटनेनूसार चालावे असे जर सर्वांना वाटत असेल,ळ तर घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने आधी घटना पाळायला पाहिजे.घटनेने राज्यपालांना जे अधिकार दिले आहेत.त्या अधिकारांमध्ये स्पष्ट सांगितले आहे की, मंत्रिमंडळाने शिफारसी आणि मंत्रिमंडळाचे निर्णय हे राज्यापालांना बंधनकारक असतात. जूनमध्ये बारा आमदारांच्या नेमणुका व्हायला हव्या होत्या.तुम्ही विधान परिषदेतल्या १२ जागा कशा काय रिकाम्या ठेवू शकता ? आज दहा महिने होत आले. घटनात्मक पदावर बसून तुम्ही घटनेचे मारेकरी म्हणून काम करत आहात का ? तुम्हाला अभ्यास करायला किती वेळ लागतो ? जो पर्यंत सरकार पडत नाही आणि माझ्या मनासारखे सरकार येत नाही तोपर्यंत मी राज्यपाल नियुक्ती आमदारांच्या शिफारशीवर सही करणार नाही, अशा काही सूचना किंवा आदेश राज्यपालांना आले आहेत काय ? तसे असेल तर राज्यपालांनी स्पष्ट करावे.मग आम्ही त्यानुसार लढाई लढतो, असा इशारा यावेळी संजय राऊतांनी दिला. तसेच १२ सदस्यांच्या नियुक्त्या न होणे हा विधीमंडळाचा अपमान आहे. भाजपचा जर घटनेशी काही संबंध असेल तर त्यांनी राज्यपालांना जाऊन सांगावे.राजकीय मतभेद,राजकीय लढाई आम्ही लढू पण, तुम्ही घटनेचा खून करू नका, अशी जहरी टीका राऊतांनी केली.
भाजपच्या प्रमुख नेत्यांचा शिवसेनेशी संपर्क
दरम्यान, नाशिकमध्ये भाजपला खिंडार पाडल्यानंतर शिवसेना भाजपला आणखी धक्के देण्याच्या तयारीत आहेत. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी शिवसेनेशी संपर्क साधला असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.प्रवाह बदलतोय, हवा बदलतेय, अजून काय…वसंत गिते, बागूल पुढे महापालिकेत काय होणार हे सांगतील.महापालिकेच्या प्रक्रियेत महत्त्वाच्या नेत्यांचा सहभाग असेल, असा सूचक इशारा देतानाच नाशिक महानगरपालिकेचा पुढील महापौर हा शिवसेनेचा असेल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला