मुंबई नगरी टीम
रत्नागिरी । नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनात महत्वाची भूमिका असणारे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.शिवसेनेकडे असलेले वनखाते शिवसेनेकडेच राहून मला विधानसभेचा अध्यक्ष केले तर मला आनंद आहे,अशी रोखठोक भूमिका भास्कर जाधव यांनी मांडली आहे.
विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर स्वगृही परतलेले भास्कर जाधव यांना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये स्थान मिळेल अशी आशा होती.मात्र मंत्रिपद न मिळाल्याने त्यांची नाराजी लपून राहिली नव्हती.आक्रमक स्वभावाचे असणारे भास्कर जाधव नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा चर्चेत आले.जाधव यांना शिवीगाळ आणि गैरवर्तन केल्याने भाजपच्या १२ आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले.त्यावेळी सभागृहात असणारी परिस्थिती ज्या पद्धतीने त्यांनी सांभाळली त्यांनतर विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी जाधव यांच्यासारख्या आक्रमक नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे वनखाते रिक्त आहे.हे खाते शिवसेनेच्या कोट्यात असल्याने राठोड यांच्या जागी जाधव यांच्या नावाची चर्चा होती.मात्र सध्या हे मंत्रिपद रिक्त असल्याने जाधव हे अध्यक्षपदासाठी योग्य असल्याची चर्चा आहे.मात्र मंत्रिपद आणि विधानसभेचे अध्यक्षपद सेनेकडे राहून मला अध्यक्ष केले तर आनंदच आहे, असे मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केले आहे.
विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेनी आपल्या कोट्यात असणा-या नव मंत्रीपदाचा बळी देवू नये असेही जाधव यांनी स्पष्ट केले.विधानसभेचे अध्यक्षपद मला मिळासे तर आनंद आहे मात्र अध्यक्ष नाही झालो तरी सभागृहात बसून विरोधकांचा सामना करेन, असेही जाधव म्हणाले. विधानसभेचा अध्यक्ष झालो तर पक्ष म्हणून काम करता येणार नाही असे सांगून,शिवसेनेकडे असणारे वनखाते काँग्रेसकडे जाणार आणि विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेनेला देणार अशी चर्चा आहे.पण लोकहिताची खाती शिवसेनेकडे नसल्यामुळे शिवसेनेच्या कोट्यात असणारे वनखाते देवून शिवसेनेने अध्यक्षपद घेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जास्त न ताणता वनखाते आणि अध्यक्षपद शिवसेनेकडेच ठेवावे असेही जाधव यांनी म्हटले आहे.वादळी ठरलेल्या पावसाळी अधिवेशनातील माझ्या कामगिरीचे कौतुक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले असल्याचे जाधव यांनी सांगितले.