मुंबई नगरी टीम
मुंबई । आपण स्वतःला या पृथ्वीचे मालक समजू लागलो आहोत,जमिनीवरचा कायदा हा आपला आहे. पण निसर्गाचे नियम त्यापेक्षा वेगळे आहेत. ते नियम आपण पाळले नाही तर निसर्ग त्याच्या पद्धतीने न्याय करतो. विकासाचा ध्यास घेऊन विनाशाकडे तर जात नाही ना याचा विचार करण्याची गरज आहे असे सांगून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने जशी जनजागृती केली जाते, तशीच राजकीय नेत्यांचीही जनजागृती व्हायला हवी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी व्यक्त केली.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात वन्यजीव सप्ताह २०२१ चा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने आपली भूमिका स्पष्ट केली.या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याहून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.तर सह्याद्री अतिथी गृह येथे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि अधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वच राजकीय नेत्यांचे कान टोचले.आपण कायदे करतो आणि आपल्या सोयी प्रमाणे त्याचा अर्थ लावतो. विकासाचे वेडे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कोणता विनाश करत आहोत हे न बघता आज आपण पुढं जात आहोत.चक्रीवादळ, अतिवृष्टी ही त्याची उदाहरणे आहेत.आपण वनांमध्ये घुसखोरी करीत आहोत. निसर्गावर आपण आक्रमण केले आणि ते असह्य झाले की निसर्ग आपले अतिक्रमण आपल्या पद्धतीने दूर करतो.त्यामुळे समजून, विचार करून पुढे जाणे गरजेचे आहे.वन, वन्यजीव आणि पर्यावरणाप्रती लोकांमध्ये जशी जनजागृती झालीच पाहिजे तशीच ती राजकीय नेत्यांमध्येही झाली पाहिजे असे मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केले.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये वन, वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन यासंदर्भातील रुची निर्माण करण्यासाठी अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश व्हावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.नाशिकला ‘मित्रा’नावाची संस्था स्थापन करण्यात आली आहे.या संस्थेत पर्यावरणपूरक विकास कसा करायचा या संबंधीचा अभ्यास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अन्न ,वस्त्र ,निवारा या मानवी मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी, त्यातही निवाऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी आपण वस्त्या वाढवत आहोत, जंगलांमध्ये जात आहोत. वाढणाऱ्या मानवी वस्त्यांना मूलभूत सुविधा,पाणी कसे द्यायचे याचा विचार करण्याची गरज आहे कारण त्या सुविधा देताना लाखो झाडांची आहुती द्यावी लागते असेही त्यांनी म्हटले.जिथे जंगल अधिक तिकडे पाऊस जास्त पडतो. पण अलिकडच्या काळात हे चित्र बदलते आहे .चेरापुंजी नाही तर दुसऱ्या भागात जास्त पाऊस पडत आहे, कोकण , मराठवाड्यात आपण अशी अतिवृष्टी पहिली आहे.त्यामुळे वन व वन्यजीव संवर्धन हे महत्त्वाचे आहे.वन संरक्षक हे वनांचे खरे रक्षक त्यांना आगामी काळात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.