मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्य सरकारच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील महत्वाच्या पाच केसेस एनसीबीकडे हस्तांतरित करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. या पाच केसेस हस्तांतरित करण्याची मागणी का होते याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे अशा शब्दात नवाब मलिक यांनी हल्ला चढवला.
राज्य सरकारच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील टाँप पाच केसेस एनसीबीकडे देण्याचे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिल्याचे मलिक यांनी आज सांगितले. राज्य सरकार हे अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या माध्यमातून काम करीत आहे. जेवढे काम एनसीबीला करता येत नाही त्याच्या किती तरी पटीने राज्य सरकारच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केले आहे. एनसीबीला काम करता येत नसेल तर केंद्राने एनसीबीचे युनिट बंद करावे असे मलिक म्हणाले.या पाच केसेसे हस्तांतरित करून राज्य सरकारचा अधिकार संपुष्टात आणला जात आहे की एनसीबीचा खंडणी उकळण्याचा धंदा सुरु आहे, असा प्रश्न नवाब मलिक यांनी केला. आता पाच महत्वाच्या पाच केसेस केंद्राकडे हस्तांतरित करून आणखीन खंडणी उकळण्याचा प्रयत्न होत आहे का असा प्रश्नही मलिक यांनी उपस्थित केला.आम्ही आमचे काम करीत आहोत. तुम्ही तुमचे काम करा असा सल्ला नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला दिला. तुमची संस्था काम करीत आहे तर मग एनसीबीने तयार केलेल्या २६ बोगस केसेसची चौकशी कधी होणार तसेच ज्या निरपराध लोकांना फसवून अटक केली त्यांना कधी सोडणार असा प्रश्न मलिक यांनी यावेळी उपस्थित केला.