मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे मंत्रालयासमोरील शासकीय बंगले आतापर्यंत क्रमांकांवरून ओळखले जात होते.मात्र यापुढे ते गडकिल्ल्यांच्या नावाने ओळखले जाणार आहेत.मंत्रालयासमोरील प्रत्येक बंगल्याला एका किल्ल्याचे नाव देण्यात आले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून सार्वजनिक बांधकाम खात्याने ही नव्या नामकरणाची कार्यवाही केली आहे.त्यामुळे राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अ-६ हा बंगला यापुढे रायगड या नावाने ओळखला जाईल.
मंत्रालयासमोरील मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानांना गडकोट, किल्ले यांची नावे देण्यात यावीत अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली होती.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते.त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने मंत्रालयासमोरील मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्ल्यांची नावे देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे आता गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अ-३ या बंगल्याला शिवगड नाव देण्यात आले आहे.कृषीमंत्री दादा भुसे यांचा अ-४ हा बंगला आता राजगड या नावाने ओळखला जाईल.आदिवासी विकासमंत्री के.सी पाडवी यांच्या अ-५ या बंगल्याला प्रतापगड असे नाव देण्यात आले आहे.राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अ-६ हा बंगला यापुढे रायगड या नावाने ओळखला जाईल.मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टिवार यांचा असलेला ब-१ बंगल्याला सिंहगड नाव देण्यात आले आहे.राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचा बंगला हा ब-२ या नावाने ओळखला जायचा आता या बंगल्याचे नाव रत्नसिंधु करण्यात आले आहे.
वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचा बंगला पुर्वी ब-३ या नावाने ओळखला जायचा आता या बंगल्याला जंजिरा या किल्ल्याचे नाव देण्यात आले आहे.ब-४ हा बंगला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा आहे.आता या बंगल्याला पावनगड नाव देण्यात आले आहे.ब-५ हा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा बंगला आता विजयदुर्ग नावाने ओळखला जाणार आहे.महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांचा बंगला पुर्वी ब-६ या क्रमांकाने ओळखला जायचा मात्र आता या बंगल्याला सिध्दगड हे नाव देण्यात आले आहे.पशुसंवर्धन आणि क्रिडामंत्री सुनिल केदार यांचा ब-७ ह्या बंगल्याला पन्हाळगड हे नाव देण्यात आले आहे.पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या क-१ या बंगल्याला यापुढे सुवर्णगड या नावाने ओळखले जाईल.राज्याचे रोहयो खात्याचे मंत्री संदीपान भुमरे यांचा क-२ बंगल्याचे ब्रम्हगिरी असे नामकरण करण्यात आले आहे.परिवहनमंत्री अनिल परब यांच्या क-५ या बंगल्याला अजिंक्यतारा या किल्ल्याचे नाव देण्यात आले आहे.क-६ या सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या बंगल्याला प्रचितगड तर क-३ या बंगल्यास पुरंदर,क-४ ला शिवालय,क-७ ला जयगड आणि क-८ या बंगल्याला विशाळगड हे नाव देण्यात आले आहे.त्यामुळे आता मंत्र्यांचे मंत्रालयासमोरील शासकीय बंगले क्रमांकांवरून नाही तर ते गडकिल्ल्यांच्या नावाने ओळखले जाणार आहेत.